कंधार ; प्रतिनिधी
मागील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचा थोड्या प्रमाणात फटका बसला असला तरी हा पाऊस तालुक्यातील रब्बी व उन्हाळी पिकासाठी जीवदान ठरला आहे. तालुक्यात रब्बी पिकाची लागवड तब्बल १७५०० हेक्टरवर तर उन्हाळी हंगामात ७००० हेक्टरच्या जवळपास पेरणी झाली असून एकूण पेरणी क्षेत्र पाहता खरीप उन्हाळी व रब्बी हंगामातील पिकाची पिक घनता ही १३६% झाली आहे.यावर्षीचा उन्हाळी हंगाम भुईमूग पिकाने बहरला असुन कंधार तालुक्यात ५६०० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग लागवड करण्यात आली असल्याची माहीती कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.
तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८४८.९९ मिमी असून मागील तीन वर्षाची पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता २०१८ मध्ये सरासरीएवढा, २०१९ व २०२० या वर्षात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. अतिरिक्त पर्जन्यमानामुळे व सातत्यपूर्ण पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठे सिंचन प्रकल्पात पाण्याचा चांगला संचय झाला तसेच जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या कामामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी अडवले गेले आणि जमिनीत मुरले त्याचाच परिणाम म्हणून लहान-मोठे ओढे नाले त्याचबरोबर विहिरी व विंधन विहिरींची पाणी पातळी वाढली या सर्व बाबींचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी खरीपपिकानंतर रब्बीचे पीक व त्यानंतर उन्हाळी हंगामात पीकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली तालुक्यात उन्हाळी हंगामामध्ये उन्हाळी ज्वारी ,भुईमूग, सूर्यफूल ,तीळ,उन्हाळी सोयाबीन, इत्यादी पिकांसह टरबूज या फळपिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणावर झाली उन्हाळी हंगामात ७००० हे पेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे.
तालुक्यात उन्हाळी भुईमूग या पिकाची सर्वाधिक ५६०० हेक्टरवर लागवड झाली आहे पिक परिस्थितीही अतिशय समाधानकारक असून या पिकापासून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नासह जनावरांसाठी चाराही उपलब्ध होणार आहे. येत्या आठवड्यात या पिकाच्या काढणीस सुरुवात होणार असून काढणीचे काम मेअखेर पर्यंत चालेल. गतवर्षी अधिख उत्पादनासह चांगले बाजारभाव मिळाल्यामुळे व शेतकऱ्यांना या पिकापासून चांगला फायदा झाल्याने त्याचाच परिणाम म्हणून या वर्षीसुद्धा उन्हाळी हंगामात या पिकाला प्रथम प्राधान्य देऊन शेतकऱ्यांनी या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. बाजारातील दर याही वर्षी चांगले राहतील आणि चांगला दर मिळून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. यावर्षी या पिकापासून किमान ६ क्विंटल पासून १२ क्विंटल पर्यंत एकरी उत्पादकता मिळण्याची अपेक्षा आहे.