अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जमात प्रमाणपत्र पडताळणीचे औरंगाबाद विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांचे आवाहन

नांदेड दि. 29 :- वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) राखीव जागेवर सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या किंवा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या अनुसूचित जमातीच्या जमात प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे जमात दावा पडताळणीचे प्रस्ताव समिती कार्यालयास सादर केलेला असल्यास त्यासंदर्भातील कार्यवाहीसाठी विद्यार्थ्याचे नाव, पत्ता व इतर आवश्यक माहितीसह अर्ज [email protected] या ई-मेलवर सादर करावेत, असे आवाहन औरंगाबाद विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 10 डिसेंबर 2019 रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी विहित कालमर्यादेत जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याबाबत आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मराठवाडा प्रशासकीय विभागातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) या राखीव जागेवर प्रवेश घेण्यास इच्छूक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे जमात पडताळणी कार्यवाही विहित कालमर्यादेत पुर्तता करण्याचा निर्णय समितीद्वारे घेण्यात आला आहे.

विद्यार्थी व पालकाची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रकरणी प्रथम प्राधान्याने जमात दावा पडताळणीच्या कार्यवाहीबाबत पुर्तता करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी झाल्याने प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असेही समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *