मित्रत्वाचा आदर्श लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते – प्रा. डॉ. रामकृष्ण बदने


मुखेड- इतिहास संकलन संस्था महिला विभाग बीड यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इतिहास संकलन संस्थेचे संस्थेचे महासचिव श्री रविंद्र दादा पाटील यांनी केले होते, ऑनलाइनच्या व्यासपीठावरून भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्री.राम कुलकर्णी यांनी मी पाहिलेले गोपीनाथराव या विषयावर विस्तृत मांडणी केली, तर दुसऱ्या पुष्पाचे प्रमुख वक्ते प्राचार्य,विठ्ठलराव घुले यांनी बहुजन समाजाच्या उन्नतीकरिता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या कार्याचा आढावा विस्तृतपणे मांडला . या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राधाकृष्ण जोशी, व डॉ. व्यंकटेश लांब यांची उपस्थिती होती. व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी, डॉ.रामकृष्ण बदने यांनी ‘ मित्रत्वाचा आदर्श : लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ‘ या विषयावर मार्गदर्शन करून श्रोत्यांची मने जिंकली.

मैत्री ही मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देण्याचे काम करते. आपल्या अंतःकरणातील एक कप्पा फक्त आपण आपल्या मित्र मैत्रिणी समोरच खुला करू शकतो.ज्याला चांगले मित्र नाहीत तो सुखापासून वंचित राहतो. अधनस्य कुतो मित्रम l अमित्रस्य कुतो सूखम ll हे यासाठीच म्हटले आहे. रामायणात राम -सुग्रीव, राम -बिभीषण आदर्श मैत्रीची उदाहरणे आहेत. तर महाभारतात कृष्ण -सुदामा,कृष्ण – अर्जुन व दुर्योधन -कर्ण हीआदर्श मैत्रीचे उदाहरण आहेत.त्यानंतर ज्ञानदेव व नामदेव हे आदर्श मित्र होते. त्यांच्या मैत्रीतूनच पसायदानाचा जन्म झाला. जर मित्र दुर्योधन व कर्णासारखे असले की महाभारताचा जन्म होतो व मित्र कामदेव दामदेवा सारखे असले की अनितीचा जन्म होतो. मित्र असावेत व ते चांगले असावेत.गोपीनाथरावजी ने आपल्या आयुष्यात बालवयापासून अनेक मित्र मिळवले. आयुष्याच्या शेवटापर्यंत टिकवून ठेवले.प्राथमिक शिक्षण काळात एकनाथराव मुंडे, विष्णू मुंडे तर माध्यमिक शिक्षण घेताना अशोक सामत,श्रीराम जोशी, अशोक मुजळकर, सुभाष दगडगुंडे हे मित्र होते. त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी महाविद्यालयीन जीवनात मित्र म्हणून लाभलेले प्रमोदजी महाजन यामुळे मिळाली. हे मित्रत्व दोघांनी आयुष्यभर टिकवले, नंतर लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांची मित्रता ही शेवटपर्यंत हो्ती.तर छगन भुजबळांसारख्या मित्र जोडून त्यांनी इतर मागासवर्गाच्या विकासासाठी काम केले. उदयनराजे भोसले, मनोहरराव जोशी, नारायण राणे, डॉ. प्रतापसिंह जाधव, विजयसिंह मोहिते पाटील,सुधाकरराव नाईक, यशवंतराव गडाख, चिंतन ग्रुपचे प्रमुख अभिनंदन थोरात,प्रवीण बर्दापूरकर, विजय गव्हाणे, संभाजी पवार असे अनेक मित्र मिळवले.त्यांनी विचारांचीही मैत्री केली ती ही शेवटपर्यंत सोडली नाही. मित्रत्वाचा आदर्श लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब होते असे प्रतिपादन ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि.नांदेड येथील माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने यांनी इतिहास संकलन युवा व महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आॅनलाईन तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना केले.


अध्यक्षीय समारोप करताना श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगावसुर्जी येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. नितिन सराफ म्हणाले की गोपीनाथरावांनी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींसाठी काम केले. शैक्षणिक क्षेत्रातील ही त्यांचे काम उल्लेखनीय आहे.मित्रत्वाचा जोडलेला धागा त्यांनी कधीच तुटू दिला नाही. आज त्यांची पोकळी जाणवत आहे. मानव कल्याणासाठी त्यांनी अनेक योजना सत्तेवर असताना आणल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यनाथ महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचे अभ्यासक प्रा. डॉ.बाबासाहेब शेप यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका व साहेबांच्या चरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकला. सूत्रसंचलन डॉ. रवी सातभाई यांनी तर आभार इतिहास संकलन संस्था बीड,महिला प्रमुख प्रा. डॉ.सौ. शांताताई गीते -जाधवर यांनी मानले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला विभाग प्रमुख अनुराधाताई राजहंस, इतिहास संकलन महासचिव श्री रविंद्र पाटील, इतिहास संकलन प्रदान कार्यध्यक्ष प्रा. डॉ.व्यंकटेश लांब, इतिहास संकलन संस्था कोषाध्यक्ष प्रा. डॉ.मुकुंद देवर्षि, इतिहास संकलन प्रदेश महिला प्रमुख भारती साठे उपस्थित होते. प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *