नांदेड – गंगाधर ढवळे
अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या अटृल गुन्हेगार विकास हटकर याच्या पोलिस कोठडीत १४ आॅगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे. लोहा येथून एका अल्पवयीन बालकाला पळवून आणणाऱ्या विकास हटकर याला व त्याच्या दोन साथीदारांना ७ आॅगस्ट रोजी निळा रोड परिसरात हटकरच्या पायावर गोळी झाडून पकडण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ११ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यात आता तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
लोहा शहरातील शुभम गिरी(वय १६) या मुलाचे ५ आॅगस्ट रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याची आई जमुनाबाई गिरी यांना वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. अन्यथा शुभमला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जमुनाबाई यांनी लोहा पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाबाबत तक्रार दिली. ७ आॅगस्ट रोजी पोलीसांनी सापळा रचून विकास हटकरला पकडले. त्यावेळी शुभमला ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी विकास हटकरच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी केले. तसेच त्याच्या दोन साथीदारांना पकडले. दोघेजण अद्यापही फरार आहेत. आज न्यायालयात हटकरला आणले असता त्याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली. त्याच्या साथीदारांना तुरुंगात पाठवले असून फरार झालेल्या आरोपींचा शोध चालू आहे. दोन तोळे सोन्यासाठी अपहरण केल्याची कबुली खुद्द हटकरनेच पोलीसांसमोर दिली होती.