कंधार ; प्रतिनिधी
पतंजली योग समिती कंधारच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त शिवाजीनगर कंधार येथील योगसंदेश निवास येथून दिनांक २१ जून रोजी गुगल मिट ऑनलाईन लाईव्ह योगवर्ग सकाळी ठिक 05.00 ते 06.30 या वेळेत संपन्न झाला. त्यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांची आॕनलाईन उपस्थिती होती.यात कंधार परिसरातील व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जवळजवळ पाचशे योग साधकांनी आपला सहभाग नोंदवला.
पतंजली योग समिती कंधारचे तालुका प्रभारी योगशिक्षक नीळकंठ मोरे यांनी आयुष मंत्रालय भारत सरकारच्या योग प्रोटोकॉलनुसार विविध योगासने, प्राणायाम व ध्यान योगसाधकांकडून करून घेऊन योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,शहराध्यक्ष ॲड.गंगाप्रसाद यन्नावार यांनीही प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.योग शिक्षक नीळकंठ मोरे यांच्या वतीने कोरोना काळात सातत्यपूर्ण जवळजवळ अडीच महिन्यापासून योग वर्ग चालु असून नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रेरित केले त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.