फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या फुलवळ येथील आरोग्य उपकेंद्राच्या डागडुजी , दुरुस्तीसाठी नांदेड जि. प. कडून गेल्या डिसेंबर महिन्यात जवळपास साडेचार लाख रुपये मंजूर करण्यात आले , त्यानुसार संबंधित गुत्तेदाराने येथील आरोग्य उपकेंद्राच्या दुरुस्ती चे काम हे निकृष्ट दर्जाचे केल्याचे अवघ्या सहाच महिन्यात उघडकीला आले असून नुकत्याच झालेल्या पावसात या आरोग्य उपकेंद्राच्या छताला गळती लागली असल्याने कर्मचाऱ्यांसोबतच रुग्णांना अक्षरशः छत्रीचा आधार घेऊनच इमारतीत थांबावे लागत आहे त्यामुळे या निकृष्ट झालेल्या कामाकडे वरिष्ठ कोणी लक्ष देतील का ? असा सवाल ग्रामस्थांतून व्यक्त केला जातो आहे.
दुरुस्तीसाठी मंजूर साडेचार लाख रुपये मध्ये इमारती ची दुरुस्ती , दरवाजे , खिडक्या , फरशी दुरुस्ती बरोबरच भिंतींची रंगरंगोटी , पाणी साठवणीसाठी सिंटॅक्स यासह अन्य कामे होती. त्यानुसार कामेही झाली परंतु पैश्याच्या प्रमाणात दर्जेदार न होता सर्व निकृष्ट दर्जाचे कामे करून संबंधित गुत्तेदार ने आपापली पोळी लाटली आणि आपले बस्तान उचलले.
शासनाने एवढे पैसे खर्च होऊनही अवघ्या सहाच महिन्यात झालेल्या कामाचा दर्जा उघडकीस आला असून नुकताच झालेल्या पावसात सदर इमारत ही जागोजागी गळत होती म्हणून येथील कर्मचाऱ्यांना व कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आलेल्या गावकऱ्याबरोबरच अन्य रुग्णांना अक्षरशः छत्रीचा चा आधार घेऊन इमारतीत ताटकळत उभारावे लागले.
याच आरोग्य उपकेंद्राच्या दुरुस्ती साठी यापूर्वी २०१४ ते २०१८ या कालावधीत तीन वेळा शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला आणि त्यावेळी ही त्या त्या गुत्तेदारांनी असेच निकृष्ठ दर्जाचे काम करून वेळ मारून नेली. मागे तसे पुढे इमारत आहे त्याच परिस्थितीत असून काही केल्या तिची गळती काही केल्या थांबेना आणि याकडे कोणता वरिष्ठ अधिकारी काही लक्ष घालेन. त्यामुळे नेमके दोषी कोण ? हेच सामान्य माणसाला कळत नसून आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
आरोग्य विभाचीच कामे अशी निकृष्ट होत असतील आणि याकडे कोणीही लक्ष घालत नसेल तर सामान्य नागरिक व रुग्णांच्या जीवाशी चालू असलेला हा खेळ थांबणार तर कधी ? असा सवाल जनतेतून समोर येत आहे.