पक्षनिष्ठ नेतृत्व : मा.ना.डॉ.भागवत कराड साहेब

( दि. १६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना. डॉ. भागवत कराड साहेब यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.)

माणसाला मोठे बनविण्यात त्याची प्रामाणिकता व कार्याप्रती किंवा विचारांप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची असते. अशा माणसांना यश प्राप्त करताना वेळ लागतो हे खरे असले तरी त्याच्या कामाचे चीज निश्चितच होते. निष्ठे बद्दलची अनेक उदाहरणे आपल्या संस्कृतीत सांगितली गेली आहेत. गंधमादन नावाच्या वानराची रामांप्रती असलेली असीम निष्ठा, कर्णाची दुर्योधना प्रती असलेली निष्ठा, किंवा हनुमंतरायाची प्रभू रामचंद्राच्या कार्या प्रती असलेली निष्ठा, शिवछत्रपतींच्या काळात मावळ्यांची राजेंच्या प्रती असलेली निष्ठा. अस्या अनेक निष्ठा सर्वश्रुत आहेत.अलीकडच्या काळात निष्ठावान माणसे फार कमी पाहावयास मिळतात. जिकडे स्वार्थ साधला जाईल तिकडे पळणारी माणसे आपण सर्रास पाहतो.अस्या काळातही आपण स्वीकारलेल्या वैद्यकीय व्यवसायासी व भाजप पक्षासी एकनिष्ठ राहून अखंड कार्य करत राहणारे नेतृत्व म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना. डॉ.भागवत कराड साहेब होत.


अहमदपूर तालुक्यातील चिखली या छोट्या गावी त्यांचा जन्म १६ जुलै १९५६ रोजी माता गयाबाई व पीता किशनरावजी यांच्या पोटी झाला. लहानपणापासूनच आई-वडिलांची बीकट आर्थिक परिस्थिती ही त्यांनी जवळून अनुभवली. परंतु घरामध्ये वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्यामुळे आई-वडिलांकडून लहानपणापासूनच त्यांच्यावर नम्रतेचे व एकनिष्ठतेचे संस्कार झाले.बंधु अंगद तर बहीणी दिपाताई व उज्वलाताई. सुरुवातीचे शिक्षण त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून घ्यावे लागले.त्यानंतर बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे ते वैद्यकीय क्षेत्राकडे प्रवेशीत झाले. एम.बी.बी.एस.व एम.एस.चे शिक्षण त्यांनी औरंगाबाद येथून पूर्ण केले.नंतर डॉ.वाय.एस.खेडकर यांच्या मार्गदर्शनाने एफ. सी. पी. एस. (बालरोग शस्त्रक्रिया ) एम.सी.एच. हे शिक्षण पूर्ण केले.त्यामुळे त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने वळण मिळाले .एम.एस.(सामान्य शस्त्रक्रिया) पूर्ण झाल्यानंतर पुढील एम.सी.एच. हे वैद्यकीय शिक्षण त्यांना बालकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन देणारे ठरले. वंजारी समाजातील पहिले ई.एन.टी.सर्जन असलेले प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व डॉ.वाय.एस. खेडकर सरांचा त्यांना सतत संपर्क आला व तदनंतर त्यांची सूकन्या डॉ.अंजलीताई यांच्यासी त्यांचा विवाह झाला. बालरोग शस्त्रक्रिया करणारे ते मराठवाड्यातील पहिलेच डॉक्टर होते. त्यामुळे मराठवाड्यातल्या अनेकांना पुणे, मुंबईला जाण्याची आता गरज राहिली नाही. ती सेवा डॉक्टरांनी औरंगाबाद येथे उपलब्ध करून दिली. पुढे त्यांनी औरंगाबाद येथे आपल्या डॉक्टर असलेल्या सौभाग्यवती सह स्वतःचे हॉस्पिटल उभे केले. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून ते अहोरात्र सेवा देत राहिले.या काळात त्यांनी आपल्या परिवाराकडे ही विशेष लक्ष दिले.एका बहीणीला वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवीधर बनवीले त्या डॉ.उज्वला कराड (दहीफळे)तर दुसऱ्या भगिनी सौ. दीपाताई कराड (गित्ते) यांना राजकारणात आणून लातूरच्या नगराध्यक्ष बनविले.


वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांनी मेव्यापेक्षा सेवेला महत्त्वाचे स्थान दिले. त्यांनी औरंगाबाद परिसरात अनेक आरोग्य शिबिरे आयोजित करून रुग्णांची सेवा केली. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वसामान्यांसाठी झटणारे डॉक्टर म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. वैद्यकीय सेवा देत असताना अनेक गावात गेल्यावर व अनेकांना भेटल्यावर त्यांच्या लक्षात आले की राजकारणाच्या माध्यमातून आणखीन जास्तीची सेवा करता येईल. त्यासाठी त्यांचे मन राजकारणाकडे आकर्षित झाले. त्याच काळात महाराष्ट्रात दीनदुबळ्यांसाठी सतत कार्यरत असलेले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांनी ते प्रभावीत झाले. पण सुरुवातीला कुठल्याही पक्षात न जाता औरंगाबाद महानगरपालिकेत अपक्ष म्हणुन उभे राहून निवडून आले. त्यानंतर हळूहळू ते मुंडे साहेबांच्या जवळ जायला लागले व डॉ.कराड साहेबांतील गुणवत्ता लक्षात घेऊन स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी त्यांना भारतीय जनता पक्षात येण्याचे निमंत्रण दिले व ते या पक्षात प्रवेशीत झाले. तेंव्हापासून आजपर्यंत त्यांनी स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब व त्यांच्यानंतर मा.सौ. पंकजाताई मुंडे यांना आपला नेता मानुन कार्य सुरू ठेवले. पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणारे व्यक्तिमत्व म्हणून पक्षात त्यांचा नावलौकिक झाला. अनेक निवडणुकात त्यांना उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी सोपविली जायची आणि ती जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षासाठी एकनिष्ठ नेतृत्व म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पक्षानेही त्यांना औरंगाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून १९९७-९८ला संधी दिली तर १९९९ ते २००० व २००६ ते २००७ या दोन्ही वेळा महापौरपदी संधी दिली. यात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सिंहाचा वाटा होता.


पक्षाने संघटनात्मक कामाची जबाबदारी त्यांना देऊन त्यांच्या कामाचा वेळीवेळी अंदाज घेतला पण त्यातही ते कधी कमी पडले नाहीत. अत्यंत प्रामाणिक राहून या जबाबदाऱ्या पार पाडत राहिले. कमी बोलणे जास्त काम करणे असा त्यांचा स्वभाव आहे.अजातशत्रु व्यक्तिमत्व म्हणून ही त्यांच्याकडे पाहता येते. आलेल्या माणसाला प्रेमाने बोलणे, त्याची अडचण समजून घेऊन ती प्रामाणिकपणे सोडवणे, नम्रभाव अंगी बाळगणे व सतत समाजसेवेत व्यस्त राहणे अशी काही गुणवैशिष्ट्ये त्यांच्या ठिकाणी आपणास पहावयास मिळतात. भाजपा पक्ष संघटनाला अधिकचे महत्त्व देतो. पक्षबांधणीत पक्षाच्या अनेक प्रशिक्षण शिबिरात त्यांनी कार्यकर्ते घडविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.पक्ष संघटन उभे करण्यासाठी विविध पदे सांभाळली. त्यांना मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या परीने केला.हे सगळे करताना गोपीनाथरावजींचा ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही’हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवूनच काम करत राहिले. पदाचा अहंकार त्यांना कधीच आला नाही.तसेच इतर पक्षाच्या सत्तेकडे पाहून पक्षांतर करावे किंवा पक्षाला आपली ताकद दाखवावी असाही विचार त्यांनी कधीच केला नाही.संतांचे संस्कार लहानपणी घरात झाले असल्यामुळे’ लहानपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा ll’या उक्तीप्रमाणे किंवा ‘ नम्र झाला भुता l तेणे कोंडिले अनंता ll’ या संत उक्तीप्रमाणे ते काम करीत राहिले. त्यांचा हा नम्रभाव व समाजाप्रती व पक्षाप्रती असलेली प्रामाणिक निष्ठाच त्यांना राज्यसभेचे खासदार बनविण्यास कारणीभूत ठरली. पक्षाने त्यांना ०३ एप्रिल २०२० रोजी अचानक राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांच्या प्रामाणिक कामाला संधी दिली. केवळ विशिष्ट जातीला खुश करण्यासाठी त्यांना ही पदे देण्यात आली असी विधाने करने पूर्ण सत्य नाही. यामुळे आज पर्यंत त्यांनी केलेल्या कामावर अन्याय केल्या सारखे होईल.यात राजकारण असेल ही परंतु पूर्ण राजकारणच आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. हे पद प्राप्त केल्यावर ही आपला मूळचा समाज सेवेचा व जमीनीसी पाय ठेवून राहण्याचा स्वभाव त्यांनी सोडला नाही. पक्षासाठी ते सतत कार्य करत राहिले आणि पक्षाने त्यांना नुकतेच देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच अर्थखात्याच्या राज्यमंत्री पदाचा पदभार दिला व पक्षात काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना हा संदेश दिला की तुम्ही पक्षासाठी सतत प्रामाणिक काम करत राहा, संयम बाळगा, समाजाची सतत सेवा करत राहा पक्ष तुम्हाला संधी देईल.


आज देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मा.ना. डॉ. भागवत कराड साहेबांवर आहे. त्यांनी शपथ घेतल्या नंतर देखील आपण ज्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे.त्यांच्या कामातून ते देशाच्या विकासाबरोबरच मराठवाड्याकडे जास्तीचे लक्ष देणार आहेत असे ते पदग्रहणानंतर बोलले आहेत.शरीराची अवघड शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला अविकासाची शस्त्रक्रिया करून विकास करणे कठीण जाईल असे मला तरी वाटत नाही.मी त्यांना मुखेड व देगलुरच्या विधानसभा निवडणुकीत काम करताना जवळुन पाहिले आहे. पक्षासाठी तन मन धनाने काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे.अत्यंत निगर्वी स्वभाव आहे. मराठवाड्यातील माणसे मुळातच अत्यंत मेहनती आहेत. त्याचा प्रत्यय त्यांच्या कामातून यापूर्वीही आला आहे व पुढेही निश्चितच येईल.देशाला या कोरोनाच्या संकटातून वाचवुन देशाची आर्थिक घडी व्यवस्थित बसविण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील यात कुठलीच शंका नाही. फक्त आपण सर्वांनी अस्या व्यक्तिमत्वाला काम करणाऱ्यासाठी निरोगी सामाजिक वातावरण ठेवुन प्रोत्साहन दिले पाहिजे. जात, धर्म,पंथ, पक्ष या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन सहकार्य भावना ठेवली पाहिजे. माझ्यासह आपण सर्वांनी प्रत्येक वेळेला विशिष्ट चष्म्यातून पाहण्याची आपली दृष्टी बदलली पाहिजे.एक पक्षनिष्ठ व कर्तव्यदक्ष माणूस आपल्या देशाच्या अर्थ खात्याच्या राज्यमंत्री झाला आहे आणि त्यांना काम करण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने मदत करू असे वातावरण निर्माण केले पाहिजे.


त्यांना भावी कार्य करण्यासाठी ईश्वर दीर्घायुरारोग्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. साहेबांना वाढदिवसाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन. मी माझा शब्दप्रपंच थांबवतो.

प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *