नांदेड/प्रतिनिधी
अतिवृष्टी व शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून 9751.32 हेक्टरवरील अधिक पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळ पिकाचे पंचनामे करून शेतकर्यांना व अतिवृष्टीने बाधित असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत द्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी मागणी केली आहे. तसेच जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकेर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जोरदार पाऊस झाला. दि. 1 ते 14 जुलै या दरम्यान नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये 9751.32 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये नांदेड, अर्धापूर, कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, नायगाव, उमरी, मुदखेड, किनवट या तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 165हून गावे अतिवृष्टीमुळे प्रभावीत झाले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या पाण्यामुळे 7 व्यक्ती मृत्यू पावले आहेत. तिघे जण जखमी आहेत. पशुधनाचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये 54 जनावरे दगावली आहेत तर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी 57 घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे या अतिवृष्टीने प्रभावीत झालेल्या व नुकसान झालेल्या सर्व बाबींचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी व इतर सर्व घटकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आली आहे. यावेळी नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर, पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे पाटील, सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, डॉ. परशुराम वरपडे, बालासाहेब मादसवाड, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शेळके, सरचिटणीस देवराव टिपरसे, सुनंदा पाटील जोगदंड, सौ. रेखा राहिरे, हिमायतनगर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, बाबुराव हंबर्डे, अॅड. प्रियंका कैवारे, नारायण शिंदे, रामदास पाटील जाधव, रमेश गांजापूरकर, शेख शादूल, विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, प्रकाश मांजरमकर, चंपत दत्तागळे आदी जणांची उपस्थिती होती.