नांदेड दि. 19 :- नांदेड पाटबंधारे मंडळातील भगीरथनगर व जंगमवाडी वसाहतीमध्ये मागील वर्षी 15 हजार वृक्षांची सघन पद्धतीने मियावाकी लागवड करण्यात आली होती. या पद्धतीने वृक्षलागवड करण्याची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन मंडळातील अभियंत्यांनी शासनाच्या विविध वसाहतीत वृक्षलागवड केली. आता ही झाडे एकावर्षाची झाली असून घनदाट वनासारखी दिसत आहेत.
या वृक्षलागवडीच्या उपक्रमास जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहीरकर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांचे हस्ते नवीन जागेवर वृक्षारोपन करण्यात आले.
नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी मंडळांतर्गत विष्णुपूरी, जानापूरी, किवळा, घुंगराळा, बारुळ, लहान, भोकर, तामसा, इसापूर, येलदरी, मालेगाव, वसमत अशा विविध ठिकाणी सुमारे 1 लाख वृक्षांची लागवड करुन त्याची जोपासना केली असल्याची माहिती यावेळी दिली. याप्रसंगी भगिरथनगर व जंगमवाडी पाटबंधारे वसाहतीतील वृक्षलागवडीचे प्रत्यक्ष काम व संगोपन करणारे अकुशल कामगार गणेश रत्नपारखे, लिपीक सर्जेराव म्हस्के, विजय वानखेडे तसेच संबधीत कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला.