कंधार तालुक्यातील धर्मापूरीतांडा शाळेचा ‘शिक्षण आपल्या दारी उपक्रमाने तांडयावरील सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा

कंधारः हनमंत मुसळे


शासनाच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीविविध उपक्रम राबविण्यावर तालुक्यात भर दिला आहे. शिक्षण विभागाने ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ याचा अवलंब करत ऑनलाईन पद्धतीने धर्मापूरीतांडा ता.कंधार येथील सहशिक्षिका अनिता दाणे यांनी ‘शिक्षण आपल्या दारी उपक्रम’राबवून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कल्पकतेने शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  पुढाकार घेतला आहे.

    तालुक्यात विविध केंद्रातंर्गत जिल्हा परिषदेच्या १८७ शाळा आहेत.ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यात ,सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून गुणवत्ता वाढविण्याचे काम या शाळेचे शिक्षक नेटाने करतात. परंतु यावर्षी कोरोना महामारीने संपूर्ण जगातील विविध क्षेत्राचे मोठे नुकसान केले आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावरही  दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत.म्हणून शिक्षण विभागाने “शाळा बंद पण शिक्षण चालू,” या बिरूदावलीचा  प्रसार करून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. वॉटसप ग्रुप,शैक्षणिक दर्शिका आदीच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणाला शहरी भागात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.परंतु ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.      ग्रामीण भागातील सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सहजरित्या परवडेल. अशा पध्दतीने ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी ग्रामीण भागातील गावे वाडी,तांडयावर होताना दिसत नाही. अनेक पालका जवळ स्मार्ट फोन नाहीत, असतील तर रिचार्ज नाही, इंटरनेट समस्या आहे.त्यातच पालकांना दैनंदिन शेतीकाम ,रोजगारासाठी व शेतमजूरीसाठी घरापासून दूर जावे लागते.याचा परिणाम होऊन मुलांच्या ऑनलाईन शिक्षणात मोठा अडथळा निर्माण होत आहे.   सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी  नेमकी अडचण लक्षात घेऊन जि.प.प्रा.शा.धर्मापुरीतांडा शाळेने “शिक्षण आपल्या दारी” हा उपक्रम हाती घेतला असल्याचे समोर आले आहे.यात विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या ,पाठ्यघटकांच्या अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्याय सराव पुस्तिका  तयार करून त्यांच्या प्रिंन्ट काढून वितरित केलेल्या जात आहेत.पुस्तिकेत इंग्रजी ,मराठी ,गणित ,परिसर अभ्यास या विषयाचे घटक देण्यात येत आहेत.शब्द वाचन,चित्र वाचन,उतरता क्रम,चढता क्रम  आदी विविध संकल्पना प्रत्यक्षात करण्यात आल्या आहेत.या गृह व पालक भेटीतून वितरित केल्या जातात. शिवाय फोन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व उजळणी केली जाते .अनुधावन कार्यरत केले जात आहे. या सर्व विषयाची काही अडचण आली तर शिक्षक त्याचे निरसन करतात.अभ्यासक्रमावर आधारित चाचणी घेतली जात आहे.गत दोन आठवडयापासून हा उपक्रम नेटाने राबविला जात आहे.      तांडयावरील स्थानिक पातळीवरील ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा विचारात घेऊन  शाळा बंद पण शिक्षण चालू ठेवून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.त्यात हा नवीन उपक्रम प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर ,गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के ,शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे,उदय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक भगवान चव्हाण यांच्या सहकार्याने अनिता दाणे या विद्यार्थ्यां पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे.त्यात सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले.म्हणून वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षण आपल्या दारी उपक्रम’राबविण्याचा संकल्प केला.आणि त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी सुरू केली.नियमाचे पालन करून गृहभेटीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा देण्यात येत आहे.त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहीती येथिल धर्मापूरीतांडा ता.कंधार शिक्षिका अनिता दाणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *