ग्रंथ…….
आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या युगात ग्रंथ वाचन संस्कृती लोप पावते की काय असं वाटत असताना कोरोनाचं संकट सगळ्या जगासमोर उभं ठाकलं. किती तरी दिवसांनी असा निवांत वेळ सगळ्यांना मिळाला आणि वाचन प्रेमींसाठी पर्वणीच ठरला.या पार्श्वभूमीवर ‘ग्रंथवसा चळवळ’ ‘एक अतिशय उत्तम असा उपक्रम आहे. माझे शिक्षण क्षेत्रातील सहकारी बंधू,एक आदर्श शिक्षक ,आपल्या मधुर वाणीने सर्वाना आपलंसं करून माणुसकी जपणारे , उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वक्ते ,राजुरा तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस श्रीयुत संदीप कोंडेकर सर यांनी मला या उपक्रमात सहभागी करून घेतले त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे.या उपक्रमात मी वाचलेली 5 पुस्तके, पाच दिवस फेसबुक वर टाकणार आहे व तो वसा पुढे चालवायला पाच पुस्तक प्रेमींना देणार आहे. आज मी हा वसा पुढे चालवण्यासाठी माझी जिवलग मैत्रीण ‘अनिता दाणे जि.प.शिक्षिका नांदेड’ यांना आमंत्रित करत आहे. त्या स्वतः उत्कृष्ट लेखिका , कवयीत्री व साहित्यिक आहेत.त्यांचे अनेक लेख ,काव्य, समीक्षण स्तंभलेखन वर्तमानपत्र ,मासिक यात प्रकाशित झालेली आहेत. त्या पदव्युत्तर पदवी परीक्षा विद्यापीठातील टॉपर आहेत. त्यांचे विविध विषयांवरील सखोल वाचन असल्याने अनेक ठिकाणी व्याख्याने सुद्धा देतात. म्हणून त्या हा वसा पुढे चालवतील याची मला 100% खात्री आहे. या मालिकेतील माझे दुसरे पुस्तक आहे …’ रिच डॅड व पुअर डॅड’ याचे लेखक आहेत ‘रॉबर्ट टी कियोसाकी’ पैशासदर्भात श्रीमंत लोक आपल्या मुलांना असं काय शिकवतात जे गरीब व मध्यमवर्गीय आई वडील शिकवत नाहीत. याविषयी महत्वपूर्ण माहिती लेखकांनी विषद केली आहे.जर तुम्हाला श्रीमंत कसं व्हायचं आणि ती श्रीमंती कशी टिकवून ठेवायचे याचे गुपित समजून घ्यावयाचे असेल तर हे पुस्तक अवश्य वाचा व आपल्या पाल्यांना वाचायला आवर्जून द्या. या पुस्तकातील लेखकाने आपल्या दोन वडीलाबद्दल (एक श्रीमंत वडील व दुसरे गरीब) त्यांच्या उपदेशाबद्दल वर्णन केले आहे.
त्यांच्या दोन्ही वडिलांची विचारसरणी अगदी विरुद्ध टोकाची होती. दोघे वडील खूप कष्ट करत होते मात्र गरीब वडिलांची सवय होती की पैशाचा प्रश्न उठताच ते आपल्या मेंदूची दार बंद करायचे तर श्रीमंत वडील आपला मेंदू तत्काळ कार्यरत करीत. त्याचा दूरगामी परिणाम असा झाला की श्रीमंत वडील आर्थिक दृष्ट्या सबळ झाले तर दुसरे मात्र दुर्बळ झाले. या दोन्ही वडिलांच्या विचारसरणीचा लेखकाने सारासार विचार करून वयाच्या नवव्या वर्षीच ठरलं की मी माझ्या श्रीमंत वडीलाचे ऐकेन आणि त्यांच्याकडून पैशाबद्दल सार काही शिकेल तसं करतेवेळी अर्थातच मी गरीब वडीलाचे विचार त्यांच्याकडे सर्व विद्यापीठांच्या पदव्या असूनही न स्वीकारण्याचे ठरवले. या पुस्तकातील प्रत्येक पाठातून बोध घेण्यासारखा आहे.
श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी केवळ शिक्षण नाही तर मोजके शिक्षण घेऊन सुद्धा योग्य विचारांची सांगड घातली तर आपण यशाचा पल्ला गाठू शकतो हे या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळते. जे कोणी भावी जीवनात श्रीमंत होऊ इच्छित असेल त्याला ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तका पासून प्रारंभ करायला हवा . हे पुस्तक केवळ श्रीमंतीचा सोपा मार्ग दाखवत नाही तर पैशासंबंधीच ज्ञान कसं विकसित करावं, आपली पैशासंबंधी जबाबदारी कशी पूर्ण करावीत आणि त्यानंतर श्रीमंत कसे व्हावे ते शिकवतात. जर तुम्हाला आपली आर्थिक प्रतिभा जागृत करावयाचे असेल तर हे पुस्तक अवश्य वाचा .
पुस्तक -रिच डॅड व पुअर डॅड
लेखक- रॉबर्ट कीयोसाकीसहलेखिका- शेरॉन लेक्टर सी. पी. ए
किंमत ₹ 195 करुणा गावंडे जांभुलकर विषय शिक्षिका