फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १७ सप्टेंबर चे औचित्य साधून फुलवळ येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकारिणीने तब्बल ८० लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेऊन एक स्तुत्य उपक्रम राबवला असल्याने त्या मंडळातील कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
कोरोना सारख्या महामारीपासून स्वतःचा , कुटुंबाचा , गावाचा पर्यायाने देशाचा बचाव करण्यासाठी शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस सर्वत्र मोफत देणे चालू आहे. त्यासाठी जनजागृती ही मोठ्या प्रमाणावर चालू आहे , तरीपण म्हणावा तसा प्रतिसाद जनमाणसांकडून मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
आता याकामी गणेश मंडळांनी ही पुढाकार घेत जनजागृती चालू केली असून आज फुलवळ येथील हनुमान चौक जुनेगावठाण येथील सभागृहात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेश मूर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
या मंडळाचे अध्यक्ष निळकंठ मंगनाळे , सचिव विक्की मंगनाळे , उपाध्यक्ष अनिल मंगनाळे , कोषाध्यक्ष विष्णूकांत पांचाळ , सदस्य देवानंद मंगनाळे , ओमकार डांगे , अनिकेत मंगनाळे , नागेश सदलापुरे , खंडेराव मंगनाळे , विठ्ठल मंगनाळे , ज्ञानेश्वर मंगनाळे व सर्व सहकारी यांनी कोविड लसीकरण बाबद गावात जागृती केली आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी तब्बल ८० लोकांना लसीकरण करून दिले.
यावेळी फुलवळ आरोग्य उपकेंद्राचे सिएचओ डॉ. मुश्ताख अहेमद , आरोग्य सेविका जयश्री गुंडे , सर्व आरोग्य कर्मचारी व सहकारी याठिकाणी लसीकरण देण्यासाठी उपस्थित होते तर तर लस घेण्यासाठी महिला , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.