नांदेड-
जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे सामाजिक एकोप्याचे प्रतिक होते. त्यांची दृष्टी व्यापक होती. त्यांच्या नांदेड येथे होणार्या भव्य अश्वारूढ पुतळ्याकडे पाहून आपणास एक वेगळीच उर्जा सदैव मिळत राहणार आहे. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे उद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काढले.
नवीन कौठा भागातील आय.जी.ऑफिसच्या बाजूला उभारण्यात येणार्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या भूमीपुजन सोहळा प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी बोलतांना ना. चव्हाण पुढे म्हणाले की, जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याचा कामाचा शुभारंभ 15 ऑगस्ट या ऐतिहासिक दिवशी करण्याचा योग आला आहे. पुतळ्या संदर्भात विविध सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. पुतळा बसविण्यासाठी थोडा वेळ लागला. या कामासाठी विविध सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचे आभार मानत शेवट मात्र गोड झाला आहे असे त्यांनी सांगीतले. आजचा हा सोहळा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. याचे मला मनस्वी समाधान आहे. नांदेड शहरामध्ये यापूर्वी अनेक राष्ट्रपुरूषांचे व महात्म्यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये आता जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची भर पडणारी आहे. जगतज्योती महात्मा बसवेश्वर समतेचे पुजारी होते. त्यांचा पुतळा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे. या पुतळ्याचे आज भूमीपुजन झाले असून लवकरच तयार होणार्या या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा भिमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारजगतगुरू, राष्ट्रसंत डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
राज्यामध्ये महाआघाडी सरकार जनतेसाठी काम करत आहे. कोरोना ही एक संधी म्हणून आम्ही पाहत आहोत. कोरोनाला हरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाकडे शासनाने निधी वळवला आहे. नांदेड येथे 200 खाटांचे सुसज्ज रुग्णालय कोरोनाच्या काळात उभे करण्यात आम्ही यशस्वी होऊ शकलो. जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. नांदेडचे रूग्ण इतरत्र का जातात याचा शोध घेतला असून वैद्यकीय महाविद्यालयातील इमारतीतील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असून यासाठी शासन बाह्य संस्थांना स्वच्छतेचे काम देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले.
नवीन कौठा परिसरात न्यायालयाची 250 कोटी रूपयांची भव्य वास्तू लवकरच उभारणार असून याच भागात सर्व कार्यालयांना एकत्रीत आणण्यासाठी प्रशासकीय इमारती उभ्या करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.यावेळी बोलतांना आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले की, महात्मा बसेवश्वरांच्या पुतळा उभारणीमध्ये भाजपाने मोठे राजकारण केले. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये लिंगायत समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस पक्ष हा सर्वांना समान न्याय देणारा असून जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा नांदेडमध्ये बसविण्याचे अभिवचन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात दिले होते. ते वचन आज अशोकराव चव्हाण यांनी पुर्ण केले आहे.
यावेळी आ.मोहनअण्णा हंबर्डे यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणारा हा पुतळा आमच्यासाठी अभिमानाची व गौरवशाली बाब असल्याचे सांगीतले. तर माजी सभापती किशोर स्वामी यांनी आपल्या भाषणामध्ये पुतळ्याचा इतिहास सांगताना लिंगायत समाज हा नेहमीच पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँगे्रेस पक्षाच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून येणार्या काळात या समाजाला विधीमंडळात प्रतिनिधीत्व द्यावे अशी मागणी त्यांनी केली. मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी पुतळा निर्मितीची प्रशासकीय बाजू आपल्या भाषणातून सांगीतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार संतोष पांडागळे यांनी मानले.यावेळी व्यासपीठावर आ.मोहन हंबर्डे, आ.अमरनाथ राजुरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ.इश्वरराव भोसीकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा.मनोहरराव धोंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, आयुक्त सुनिल लहाने, माजी महापौर सौ.शैलजा स्वामी, माजी सभापती किशोर स्वामी,भाजपाचे प्रकाश कौडगे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर, माजी सभापती माधवराव पांडागळे, उपमहापौर सतीश देशमुख, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, जि.प.चे सभापती संजय बेळगे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, अनिल पाटील खानापूरकर, सुनिल शेट्टे, दिलीप डांगे, वैजनाथ देशमुख, राजु शेटे, बाबूराव सायाळकर, बालाजी पांडागळे, दिपाली मोरे, राजू काळे, संजय मोरे, शांताबाई गोरेे, सुभाषअप्पा सराफ, संतोष मोरे, उमेश पवळे, सचिन टाले, विजय होकर्णे, विश्वनाथ देशमुख, लक्ष्मीकांत गोणे, सतीश राखेवार, आर्टिटेक्ट अनिल माळगे, ठेकेदार नागेश शेट्टी आदिंची उपस्थिती होती.