फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
यंदा पावसाने सर्वत्र चांगलाच कहर घातला असल्याने खरिपाच्या शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे तर केलेली मेहनत व खर्च मातीमोल गेला म्हटले तर वावगे ठरणार नाही , म्हणूनच प्रत्येकाच्या प्रतिक्रियेतून एवढंच ऐकायला मिळते आहे की देवा पावसाला आता थांब म्हणा कारण शेतकऱ्यांचा मोडलाय कणा..
गेली काही दिवसांपासून पावसाची सतत धार चालू असून अधून मधून अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण करणारा पाऊस कहर घालतो आहे . त्यामुळे खरिपाच्या पेरणी पासूनच शेतकऱ्यांच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागले की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. एकदाची पेरणी करून मोकळा झालेल्या बळीराजाला त्या पिकाचे उत्पन्न पदरी पडण्याअगोरदरच बेरीज वजाबाकी चे गणितं मांडून आपला जीवनगाडा व संसार कसा सुखाचा होईल याची आकडेमोड करण्याची परंपरागत जुनी आदतच , यंदाही तसेच काहीसे स्वप्न उराशी बाळगून आलेला दिवस पुढे ढकलताना ऐन हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला त्यामुळे आपला कधीच न संपणारा जीवन संघर्ष कधी थांबेल या आशेने शेवटी देवाकडेच विनवणी करतोय की देवा आतातरी पावसाला थांब म्हणा कारण आम्हा शेतकऱ्यांचा मोडलाय हो कणा , अशी आर्त टाहो फोडतो आहे.
उभ्या सोयाबीन ला जागेवरच कोंब फुटायला सुरुवात झाली असून कापूस , ऊस , ज्वारी , तूर आडवी होऊन लोळण घालते आहे . तेंव्हा ज्याच्या जीवावर आम्ही शेतकरी राबराब राबतो आणि निसर्गाशी जुगार लावतो आणि नशीब आजमावतो. पण या सट्टेबाजीत गेली काही वर्षांपासून आम्ही नेहमीच हरतोय , यंदातरी नशीब उजडेल अशी आशा होती परंतु आता तीही मावळल्यागत झाली आहे अशी चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
काल ता. २७ सप्टेंबर रोजी दाखल झालेले गुलाब नावाच्या वादळाने तर चक्क काटेच पेरले म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण कालपासून झालेल्या अतिवृष्टी ने शेतीचे , शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान केलेच आहे परंतु नद्या , नाल्यांना आलेल्या पुरामुळे चक्क जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. कंधार तालुक्यातील मन्याड नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कंधार ते मुखेड व कंधार ते जांब या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक ठिकाणी खड्डेमय रस्ते असल्याने वाहतुकीला चांगलीच खीळ बसली आहे.