फुलवळ (धोंडीबा बोरगावे)
मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे कंधार तालुक्यातील फुलवळ मराठी पत्रकार संघानेही तो आज मोठ्या उत्साहात साजरा करून पत्रकारितेच्या जनकाला नम्रपूर्वक अभिवादन केले. याचवेळी फुलवळ येथील माजी सरपंच बालाजी देवकांबळे व ग्रामस्थांच्यावतीने फुलवळ व कंधार येथील उपस्थित सर्व पत्रकारांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली या आयोजित सोहळ्यात प्रथमतः दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आ. त्यानंतर फुलवळ चे माजी सरपंच बालाजी देवकांबळे व ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा पुष्पहार , लेखणी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणं झाली . तसेच फुलवळ पत्रकार संघाकडून एकजुटीचा सामुदायिक संकल्प करत निर्भीड पत्रकारिता करतांना लेखणीच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देत गाव व समाज विकासासाठी सकारात्मक बातम्या छापून लेखणीची धार कायम तेज ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प ही करण्यात आला .
तसेच नांदेड उस्माननगर , फुलवळ मार्गे उदगीर जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग वर फुलवळ येथे दिशादर्शक फलक प्रशासनाकडून बसवण्यात आले नसल्याने प्रवाशांना फुलवळ येथून मुखेड जाणारा कोणता मार्ग आहे आणि जांब , उदगीर जाणारा कोणता मार्ग आहे हे कळेनासे झाल्यामुळे प्रवाशांची चांगलीच हेळसांड होत होती. ही बाब फुलवळ पत्रकार संघाने ओळखून झोपेचे सोंग घेत असलेल्या प्रशासन व ठेकेदाराला चपराक देत स्वखर्चाने दिशादर्शक फलक तयार करून आयोजित कार्यक्रमात फुलवळ ग्राम पंचायत च्या स्वाधीन केला असून तो तात्काळ योग्य ठिकाणी बसवावा अशी विनंती केली आहे.
यावेळी फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर डांगे , सचिव दिगंबर डांगे , पत्रकार संघाचे कंधार तालुका अध्यक्ष जमीर बेग , हिंदवी बाणाचे संपादक माधव भालेराव , मुरलीधर थोटे , सिकंदर शेख , सुभाष वाघमारे , एस पी केंद्रे , भागवत गोरे , धोंडीबा बोरगावे , विश्वाम्भर बसवंते , मधुकर डांगे , शादुल शेख , होनाजी शेळगावे , राजकुमार फुलवळकर आदी पत्रकारासह आनंदा पवार , प्रवीण मंगनाळे , संजय फुलवळे , चंदबस मंगनाळे , दत्ता डांगे ,उद्धव देवकांबळे , रंगनाथ पांचाळ , सिद्धेश्वर मंगनाळे सह ग्रामस्थ उपस्थित होते.