मुंबई –
एसटी महामंडळाला ज्या पद्धतीने आंतरजिल्हा वाहतूकीची परवानगी मिळाली तशी राज्यातील खाजगी वाहतुकीलाही परवानगी मिळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
या निमित्ताने वंबआची आणखी एक मागणी पुढे आली आहे.
राज्यात २० आॅगस्ट पासून एसटी बसचा जिल्ह्याबाहेरही प्रवास सुरू झाला आहे. यापुर्वी जिल्हांतर्गतच या बसेसना परवानगी होती.
या संदर्भात वंचितने राज्यभर डफली बजाओ आंदोलन केले होते. सरकारी दडपशाहीला भीक न घालता एसटी कर्मचारी,
सामान्य नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी केलेल्या आंदोलनाचे फलित म्हणून एसटीला आंतर जिल्हा प्रवासाची परवानगी मिळाली, असे वंचितचे म्हणणे आहे.
एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई-पासचे बंधन सुद्धा रद्द करण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही अभिनंदन करत असताना, खासगी वाहतूक व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र दुर्लक्षित करण्यात आले आहे.
खासगी वाहतुकीवर किंवा प्रवाशांवर जिल्हाबंदी किंवा इ-पासचे बंधन लादण्याचे काहीच कारण नाही.
त्यामुळे राज्यात कुठेही जाण्यासाठी ई-पासची अट पूर्णपणे रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली आहे.