बौद्धेत्तर, तेलगू भाषिक आंबेडकरी गायक – नारायण सिरसील्ला.

 

      महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वसामावेशक मानवतावादी विचार हा अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी असल्यामुळे प्रांत,


भाषेची मर्यादा  ओलांडून भारत व भारताबाहेर विस्तारला. 


आंबेडकरी चळवळीत अनेक भाषिक गायक कलावंत गीतकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भरीव असे योगदान दिले आहे. 

त्यात तेलगू भाषिक  गायक कलावंत नारायण सिरसिल्ला यांचे योगदान उल्लेखनीय आहे. 

     आंबेडकरी विचाराने प्रभावित होवून तेलगू भाषिक नारायण सिरसिल्ला यांनी आपल्या गीत गायनातून आंबेडकरी विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला.


 तसे नारायण सिरसिल्ला यांचे आई -वडील( राजम्मा व बाशय्या) हे मूळचे तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील रहिवाशी तेथील DBR मिल मधील गिरणी कामगार.

 सिकंदराबादच्या DBR मिलमधून नांदेडच्या उस्माशाही (आताची NTC) मिलमध्ये त्यांच्या वडिलांची बदली झाली व त्यांचे आईवडील नांदेडला आले.


 उस्मानशाही मिल परिसरातील गंगाचाळ या गिरणी कामगाराच्या वस्तीत ते राहावयास आले.गंगाचाळ या गिरणी कामगाराच्या वस्ती अनेक कलावंतांचे माहेरघरच.


 गंगाचाळ भागात राहत असतांना शेजारी संघशक्ती गायन पार्टी होती.त्या गायन पार्टीचे गायनातील सूर नारायण सिरसिल्ला यांच्या कानी पडायचे आणि यातूनच त्यांना बुद्ध-भीम गीत गायनाची आवड निर्माण झाली. 

या गायन पार्टीचे अध्यक्ष दत्ता थोरात (हार्मोनियम), देवराव हुटाडे (बुलबुलतारा), पुंडलिक गोडबोले(तबला), भिवा नवघडे (ढोलक), विजय पंडित, हिरामण धुळे, अंबादास इंगोले, दत्ता ढगे आणि

 नारायण सिरसिल्ला हे ही  संघशक्ती गायन पार्टीत गायक कलावंत म्हणून नावारुपाला आले.पुढे संघशक्ती गायन पार्टीखूप लोकप्रिय झाली होती.

            नारायण सिरसिल्ला हे तेलगू भाषिक असून सुद्धा मराठी उत्तम प्रकारे बोलायचे. मराठी, हिंदी, तेलगू भाषेत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे  गीत गायन करायचे.

 त्यामुळे साहजिकच बौद्ध समाजात ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. ग्रामीण व शहरी भागातील लोक त्यांचे कार्यक्रम आवडीने ठेवू लागले.

           ही तुला वंदना रामजी
 नंदना !
           मुक्त केले दीना तोडुनी
 बंधना !!

                   कवी-गायक गीतकार बाबा दलितानंद यांनी  लिहिलेलं हे गीत नारायण सिरसिल्ला तबल्याच्या ठेक्यावर व हातवारे करुन फारच उत्स्फूर्त पणे गात असत.

 तेंव्हालोक फारच खुश होवून त्यांच्या गीतांना दाद द्यायचे. तुम्ही गीत गायन करायचे तेंव्हा लोकांच्या प्रतिक्रिया कश्या असायच्या असे विचारले असता सिरसिल्ला म्हणाले, 

ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणचे लोक जेवण करून कार्यक्रम ऐकण्यासाठी रात्री नऊ वाजता यायचे ते सकाळी सहा कधी वाजले ते समजायचं नाही.

 एव्हढे तल्लीन होवून लोक मी गायलेली बुद्ध-भीम गीते ऐकायची. कार्यक्रम संपला तरी लोक उठायला तयार नसायची.

             मी तर शिष्य भीमाचा जातो
 बुद्ध मंदिराला !

              संग माझ्या चला रे चला !!

                   त्रिसरणाची साथ देवूनी
 धूम-धूमवू शहराला !

                   पंचशिलेचा मंत्र
 म्हणाला जावू नागपूराला !

                  संघटनेची शक्ती दाखवू
 आपण या जगताला !!

                   संग माझ्या चला रे
 चला…!!!

              सत्य अहिंसा प्रज्ञा करुणा
 ज्योत तेवते तेथे !

              म्हणून जोडली तथाताशी
 माझ्या भीमाने नाते !

              तया समोरी बोथट होती
 तलवारीचे पाते !

              संग माझ्या चला रे
 चला……!!!

                   सोडा रे मतभेद
 गाड्यांनो आपण सारे भावू !

                   एकमताने एकदिलाने
 बुद्ध मंदिरी जावू !

                   सोडू नका त्या
 प्रतापसिंगा सोबत त्याला घेवू !

                   संग माझ्या चला रे
 चला….!!!

                   अशी ऐका पेक्षा एक बुद्ध व भीम गीते  लोकांच्या पसंतीस उतरायची.

 पुढे मराठवाडा, आंध्रप्रदेश,तेलंगणातील सिकंदराबाद, हैद्राबाद आदी ठिकाणी भाषेचा प्रश्न निर्माण होत असे मग तिथे अगोदर तेलगू भाषेत डॉ.बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करून गीतांचा अर्थ सांगून  गीत गायन करत होतो. 

बुद्ध-भीम गीत गायन करण्याचा माझ्या जीवनावर असा परिणाम झाला की, याच काळात मला नांदेड जिल्हा परिषदेत लिपिक पदाची नोकरी लागली. 

आज मी जो ही काही आहे. ती केवळ बाबासाहेबांचीच पुण्याई आहे. असे नारायण सिरसिल्ला आवर्जून सांगतात.

             महाकवी वामनदादा कर्डक यांची 1970 साली नांदेडला भेट झाली.त्यांचा आशीर्वाद मला लाभला. पुढे बऱ्याच वेळा दादांच्या भेटी होत गेल्या.

 वामनदादांचं खास वैशिष्ठ हे की, त्यांच प्रत्येक गीत हे स्वतंत्र चालीवर असायचं. नवीन गीत लिहिलं की, देवराव हुटाडे व मला त्या गीतांची चाल हार्मोनियम वर म्हणून दाखवायचे.

बरीच गाणी वामनदादांनी नांदेड मध्ये असतांना लिहिली आहेत.त्यांचा सहवास लाभत गेला.आम्ही धन्य झालो.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,”मोठ्या परिश्रमाने मी हा समाजाचा गाडा इथपर्येंत आणलेला आहे,आता तुम्हाला तो पुढे नेता येत असेल तर न्या,पण मागे मात्र त्याला जावू देवू नका”. 

पण भीमराया पाठी आम्ही काय-काय केलं तर माणसात माणसाला राहू नाही दिलं.अशा आशयाच गीत सिरसिल्ला जोशपूर्ण आवाजात गात होते, तेंव्हा लोक मात्र अंर्तमख होवून गीत ऐकत होते.

         भीमराव ठरले जगती महान !

          पदो-पदी साहूनी अपमान !

          राखली भीमाने शान !

          विकला ना स्वाभिमान !!!

                        मी आणलो हा रथ

 इथवर !

                        न्या पुढती न्या हो

 जिथवर !

                        पण मागे सरू नका न्या हो इतभर !

                        लाजेल तुम्हाला ही
 लाज ही लाज !

                        भीमराव ठरले
 जगती महान !!१!!

         भिमराया पाठी आम्ही

 काय-काय केलं !

         माणसात माणसाला राहू नाही
 दिलं !

         भिमराया गेल्यावर फिरून पुरा

 नांगर !

         उध्वस्त कराया घरं निर्बुद्ध

 आम्ही लेकरं !

         एकाहून एक वरचढ सरसावूनी

 आपलं पुढं !

         लयी कार्य केलं अवघड
 ऐकीच काढलं मढ !

         दुही घडवली वाढी लावली

 करून घेतलंय भल-भल!

                      भिमराया पाठी

 आम्ही काय-काय केलं!

                      माणसात माणसाला

 राहू नाही दिलं !!

              नांदेडला 1971-72 साली लोकसभेची पोटनिवडणूक होती. या निवडणुकीला सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. 

त्यांची निशाणी सायकल होती. तेंव्हा मी माझ्या संचाच्यावतीने जिथं  भैय्यासाहेबांची प्रचार सभा असेल तिथं मी स्वयं स्वयंस्फूर्तीने गीत गायन करून त्यांचा प्रचार आणि प्रसार केला होता .

याचा मला मनस्वी सार्थ अभिमान असल्याचे सिरसिल्ला सांगत होते.

                     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम शोषितांना बौद्ध धम्माची दिक्षा व बावीस प्रतिज्ञा देवून बौद्ध केले.

पण त्यांच्या पश्चात बौद्ध समाजात आज ही रोटी व्यवहार आहे पण बेटी व्यवहार म्हणावा तसा होतांना दिसत नाही.

 आपण आपसातील पोट जाती सोडणार नाहीत तर बाबासाहेबांचे स्वप्न कसे पूर्ण करणार? तेंव्हा बौद्धांनी आता दुऱ्यावर टीका-टिप्पणी करणे सोडून आपला धम्म इतरांना समजावून सांगून त्यांना आपलेसे केले पाहिजे.

यातच आपल्या सर्वांचे हीत असल्याचं सिरसिल्ला यांनी आपलं मत व्यक्त केलं.

                 आंध्रप्रदेशातील म्हैसा येथे 1976-77 साली सर्वच समाजाच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणात भीमजयंती सोहळा आयोजित केला होता.


त्या निमित्त माझा गीतगायनाचा कार्यक्रम ठेवला होता. या भागात तेलगू भाषिक लोक जास्त असल्यामुळे अगोदर मला गीताचा अर्थ तेलगू भाषेत समजावून सांगावा लागला. 

तिथं वामनदादा कर्डक यांच अतिशय गाजलेलं गीत गायिलं होतं. 

         भिमाची कोटी मुलं कोटी मुलं कोटी मुलं !

         वाहती त्यांच्या पदी कोटी-फुलं कोटी फुलं !

                  भीमाचा लोक लढा, होता देशाला धडा !

                  तरी ना कुणी बडा राहिला पाठीशी खडा!

                  राहिली छायेपरी पाठीशी त्याचीच पिलं !!१!!

          मांगाला महाराला,मेहत्तर चांभाराला !

          शिक्षण केलं खुल रामोशी वडराला !

          तरी ना भारतानं मानाच एक पान दिलं !!२!!

                समता वास करी,अश्या बुद्धाच्या घरी!

                जावून वामन परि जनता पाय धरी !

                त्याच जनतेला इथं क्रांतीच अवसान आलं !!३!!

हे गीत ऐकून जमलेल्या सर्वच समाजातील लोकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात माझे स्वागत केले. असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात आले.

ते केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीत गायनामुळेच. नारायण सिरसिल्ला हेबौद्धेत्तर  व तेलगू भाषिक असून सुद्धा आंबेडकरी विचाराने प्रभावित होवून गीत गायनाच्या माध्यमातून त्यांनी जे समाज प्रबोधनाचे कार्य केले त्यास तोड नाही.

71 व्या वर्षी सुद्धा नारायण सिरसिल्ला हे आज ही बाबासाहेबांच गीत गाण्यासाठी सज्ज असतात. त्यांनी सदैव असेच बुद्ध-भीम गीते गावून लोकांचे प्रबोधन करत राहावे. ही मंगल कामना. जयभीम !      

                    –  सदाशिव गच्चे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *