प्रसिद्ध लेखक,समीक्षक, पुरोगामी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते सोनू दरेगावकर लिखित जगणं दुनियादारीचं हे पुस्तक तरूण पिढीसाठी व्यक्तिमत्व विकासाच्या वाटा दाखवणारे ठरेल. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करणारे लेखक सोनू दरेगावकर एक प्रामाणिक आणि सोज्ज्वळ व्यक्तिमत्व म्हणून आम्हा मित्र परिवारासह सबंध नांदेड जिल्ह्यात परिचित आहेत.
समाजातील प्रश्नाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहणारा संवेदनशील मनाचा माणूस,भविष्याचा वेध घेणारा सिद्धहस्त लेखक म्हणून सोनू दरेगावकर यांच्याकडे पाहिले जाते. आशयबोध असे सुंदर मुखपृष्ठ आणि त्यावरील बोलकी चित्रं हे या पुस्तकामध्ये काय दडले आहे हे सांगून जातात. मुखपृष्ठावर अगदी वरच्या बाजूला “माणसात वाद नाही संवाद हवा!” हे वाक्य पुस्तकाची दिशा अधोरेखित करते.
अगदी शुल्लक आणि जुजबी गोष्टीसाठी वाद घालून प्रश्न वाढवणाऱ्यांची संख्या समाजात खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छोट्याछोट्या प्रश्नाला वाढवत मोठं करणे आणि त्यामध्ये वेळ, श्रम, पैसा याचा अपव्यय करणे हल्ली काही लोकांची फॅशन झाली आहे.
या वादात वेळ, श्रम, पैसा तर जातोच, पण कधीही न भरून येणारा मनस्ताप मात्र अनेक आजाराला निमंत्रण देऊन जातो.
या पुस्तकातून सुंदर संदेश दिला आहे,की लोकांमधला वाद कमी होऊन समाजातला संवाद वाढला पाहिजे. हल्ली सामाजिक पातळीवर आपण पाहायला गेलो, तर जातीय आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचं पद्धतशीर षडयंत्र काही व्यवस्थेकडून सुरु आहे. भलेही त्यांना त्यांचा राजकीय फायदा घ्यायचा असला,तरी यामध्ये मात्र अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे दोन समाज मात्र परस्परांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहत आहेत. अनावश्यक गोष्टीवर चर्चा घडवून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे.जातीय आणि धार्मिक सलोखा नष्ट होईल या पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत.अश्लाघ्य स्वरूपाच्या टिप्पण्या जाहीररित्या केल्या जात आहेत. कथा,कादंबऱ्या,पुस्तके मालिका अथवा चित्रपटातून दोन समाज परस्परांच्या विरोधात कसे उभे राहतील अशा स्वरूपाचे भडक दृश्य दाखवले जात आहेत.या गोष्टी हेतू पुरस्सर केल्या जात आहेत. अशा काहीशा कठीण परिस्थितीमध्ये या पुस्तकातून दिलेला संदेश नक्कीच राज्य आणि राष्ट्र बांधणीसाठी खूप मोलाचा ठरेल असे वाटते.
सोनू दरेगावकर यांनी या पुस्तकात चारोळ्याच्या माध्यमातून संदेश दिला आहे. हा संदेश प्रत्येकाच्या सुंदर आणि निरामय आयुष्यासाठी मोठी शिदोरी ठरणार आहे.
सदर पुस्तक अक्षर ओळख झालेल्या लहान मुलापासून ते अगदी शेवटच्या उंबरठ्यावर गेलेल्या वयस्क, वृद्ध पिढीपर्यंत उपयोगी ठरणारे आहे. बोलकी चित्रं आणि त्यांना समर्पक असा मजकूर वाचकाला खेळवून ठेवतो. आकर्षक आणि विचार प्रवर्तक मुखपृष्ठ, सहज हाताळता येईल असा पुस्तकांचा सुंदर आकार, सुरेख मांडणी हे या पुस्तकाची काही मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील. ग्रामीण भागातून आणि सर्वसामान्य कुटुंबातनं आलेला लेखक समाजाप्रती कायम कृतज्ञ आहे.
सदर पुस्तक त्यांनी आपल्या जन्मदात्या पित्याला म्हणजेच जनसेवक बबन खंडू दरेगावकर यांना अर्पण केले आहे. यातून लेखकांची त्यांच्या वडिलांच्याप्रती कृतज्ञता स्पष्ट होते.
आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या भावनेने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत सक्रिय काम करणारे सोनू दरेगावकर हे उपेक्षित,वंचित समाजातील अनेक नव्या चेहऱ्यांना पुढे आणून त्यांना सन्मानित करत असतात. अंधारात चाचपडणाऱ्या लोकांना ते आशेचा मार्ग दाखवत असतात. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी मजूर, बहुजन वर्ग त्यांच्या कायमच केंद्रस्थानी असतो.प्रतिवर्षी ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीवही करून देत असतात.
अतिशय कष्टाने, जिद्दीने, मेहनतीने आणि अनेक संकटावर मात करून यश प्राप्त करणाऱ्या यशवंतांचा ते प्रतिवर्षी गौरव करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. त्यांचा हा सत्कार समारंभ अतिशय नेटका आणि प्रेरणादायी असतो.
पुणे येथील नामांकित अशा स्वंयदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या वैचारिक पुस्तकाला शिक्षण तज्ञ, माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेड सर यांची विचार प्रवर्तक अशी प्रस्तावना आहे,तर बहुजन समाजातील प्रख्यात विचारवंत, लेखक,अभ्यासू व्यक्तिमत्व तथा यशदा पुणे येथील वरिष्ठ अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी सोनू दरेगावकर यांची पाठराखण केली आहे. समाज मनाचा ठाव घेणारे हे पुस्तक प्रकाशना पूर्वीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साऱ्या जगाचं आकर्षण असणाऱ्या दुबई या श्रीमंत शहरात संपन्न झाला. आपली डोळे सदैव उघडे ठेवून समाजमन वाचणारे लेखक सोनू दरेगावकर यांच्या नजरेतून ग्रामीण भागातले अनेक प्रश्न,अडचणी उजागर झाल्या आहेत. माणूस म्हणून पुढे जायचे असेल तर केवळ एकट्याने पुढे न जाता कुटुंबाला, समाजाला पुढे घेऊन चाललो तर त्यातून राष्ट्रीय उन्नती साधता येईल.अशा स्वरूपाचे अनेक सुंदर वचने या पुस्तकात पावलोपावली पाहायला मिळतात. ज्यांनी आपलं सारं आयुष्य काळया मातीची सेवा करण्यात झिजवलं आहे,त्या शेतकरी बापाचा सन्मान झाला पाहिजे ही विनम्रतेची भावना लेखकाने मांडली आहे. वडिलांच्या खांद्यावरती बसून आपण सारं जग पाहतो. ज्याच्यामुळे आपण या जगात आलो आहोत आणि हे जग पाहण्याचा आनंद घेतोय त्या आईबापाला शेवटपर्यंत विसरू नये अशी माफक अपेक्षा लेखकाने या पुस्तकातून केली आहे.प्रत्येकाने आपल्या वडिलांच्याप्रती संवेदनशील असावं आणि कायम कृतज्ञ राहावं असे महत्त्वाचे संदेश या पुस्तकातील अनेक चित्रात आपणास पाहावयाला मिळतात.
या पुस्तकातील नुसते चित्र जरी बारकाईने पाहिले, तर माणसाचं माणूसपण जागा होईल आणि त्यांच्या हातून काहीतरी चांगलं घडेल यात शंका नाही. आपण असं नेहमी म्हणतो, की हजार शब्द बोलण्यापेक्षा एक चित्र काढा, जे चित्र तुमचा संदेश सर्वदूर पोहोचवेल. या वाक्याला पूर्णार्थाने समर्पक ठरेल अशा स्वरूपाची सुंदर चित्रे सोनू दरेगावकर यांनी संग्रहित केली. ती उत्तम पद्धतीने ये पुस्तकाची चितारली.या देखण्या चित्रांना अत्यंत सुंदर बोलक्या म्हणी, चारोळ्या, वचनाने सजवले आहे. कमी शब्दात मोठा आशय सांगणारे हे पुस्तक नक्कीच येणाऱ्या पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पूर्वीच पुस्तकाच्या अनेक प्रती आगाऊच्या बुकिंग झाल्या होत्या, यातच लेखकाचं स्पृहणीय यश आहे.
सोनू दरेगावकर हे आमचे चळवळीतील सहकारी किंवा जिवाभावाचे मित्र आहेत म्हणून त्यांचं हे कौतुक नव्हे,तर ते खरोखर एक प्रेमळ, सोज्वळ आणि चिंतनशील लेखक आहेत म्हणून हे चार शब्द लिहिले आहेत. समाजासाठी सदैव एक पाऊल पुढे ठेवून कार्य करणारा कार्यकर्ता, अडचणी सापडलेल्या माणसाची अडचण दूर करणारा समाजसेवक आम्हाला सोनू दरेगावकर यांच्यामध्ये दिसतो. पुस्तक हातात पडल्यानंतर संपेपर्यंत सुटत नाही हेच या पुस्तकाचं खरं गमक आहे. त्यांच्या भावी लेखन कार्यासाठी मनापासून सदिच्छा!
आपने आपकी तारीफ करना तो फिजल है,
खुशबू तो खुद बता देती है,
की फूल कोनसा है!
प्रा.संतोष देवराये, प्रशिक्षक, मराठा सेवा संघ महाराष्ट्र.
मो.9860820657