सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ठेकेदार व अधिकाऱ्यांची मुजोरी..! राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे फुलवळ येथे अर्धवट काम

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

 नांदेड ते उस्माननगर - फुलवळ मार्गे उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे फुलवळ येथे अर्धवट काम करून संबंधित मे. कलथीया एजन्सी गायब झाली की काय ? असा सवाल प्रत्येकाला च पडला होता. सदर रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच उर्वरित अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे अशी वेळोवेळी मागणीही केली जात होती . अखेर तो दिवस उजाडला आणि ता. २७ जानेवारी रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्या शिल्लक राहिलेल्या अर्धवट रस्त्याचे मोजमाप घेतले खरे परंतु आजपर्यंतही राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी ना ठेकेदार इकडे फिरकला ना कोणता संबंधित अधिकारी याबद्दल गावकऱ्यांतुन व प्रवाशातून संताप व्यक्त केला जात असून मोजमाप टाकून दोन महिने पूर्ण तरीपण राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण असेच म्हणण्याची वेळ आली असतानाच ठेकेदार आणि अधिकारी किती दिवस करणार मनमानी , सांगता येणार नाही कधी होईल जीवितहानी असा सवाल विचारत , साहेब आता पाहू नका अंत नाही तर जाईल कोणाचातरी देहांत अशी चिंता व्यक्त करत आहेत.



      सदर रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण व विद्युत डेपो हटवून काम पूर्ण करण्यास सहकार्य करावे असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राम पंचायत ला पत्र व्यवहार करून केवळ पळवाट काढली होती . आणि संबंधित विभाग केवळ झोपेचं सोंग घेत त्या कलथीया एजन्सीची पाठराखण करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. 

दोन महिन्यांपूर्वी उर्वरित कामासाठी मोजमाप टाकले खरे परंतु नेमकं घोड कुठं पेंड खातंय हेच कळेनासे झाले असल्याने संबंधित अधिकारी आणि ठेकेदार च तर आपापले हात ओले करत आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा असे म्हणत सदर काम मुद्दाम होऊन लांबणीवर टाकत असावेत अशीच चर्चा सध्या सगळीकडे ऐकायला मिळत आहे.

   फुलवळ बस स्थानक शेजारी जांब व मुखेड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाय पॉईंट तयार झाला असून त्या ठिकाणचे वळण हे अत्यंत धोकादायक बनले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढत असून कधी कोणाचा जीव जाईल हे सांगणे जरी कठीण असले तरी वाढत्या वाहतुकीचा विचार करता सावधानता बाळगणे ही तेवढेच महत्त्वाचे असल्याने प्रशासन व संबंधित ठेकेदार ला जागे करत अखेर सदर अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत ने वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला . आणि यासंदर्भात वारंवार बातम्या प्रकाशित करून प्रशासन व ठेकेदार यांना वेठीस धरण्यात प्रसार माध्यमाचा मोठा वाटा असल्याच्या भावना जनमाणसातून ऐकायला ही मिळाल्या , परंतु पैश्याच्या , सत्येच्या व अधिकाराच्या जोरावर निगरगट्ट झालेल्या या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना मात्र कशाचीच पर्वा नसल्याचे दिसून येत आहे. 


     केंद्रशासनाच्या या रस्त्याचे काम आता नक्कीच चालू होणार असून या रस्त्याची रुंदी १०० फूट असून सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्ते व आर सी सी नाली सुद्धा दोन्ही बाजुंनी करणे अनिवार्य असल्याचे सांगून ता. २७ जानेवारी रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी फुलवळ येथील उर्वरित रस्त्याचे मोजमाप घेतले , गावकऱ्यांकडून अतिक्रमण हटवण्यासाठी सहकार्याची अपेक्षा असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले तेंव्हा येथील ग्राम पंचायत व गावकऱ्यांनी ही नक्कीच सहकार्य करू असा विश्वास दिला , परंतु तब्बल दोन महिने झाले मोजमाप टाकून तरीही त्या अर्धवट कामाला काही अद्याप सुरुवातच झाली नाही.


   ज्याठिकाणी खरी अडचण आहे त्याठिकाणचे काम पूर्ण न करता सदर ठेकेदार टोल नाक्याचे काम पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे. त्यामुळे येथीलच कांही सुज्ञ , जाणकार व गावहिताचा विचार करणाऱ्या तरुणांनी आता मात्र एकच पवित्र घेतला आहे तो म्हणजे त्यांनी टोल नाक्याचे काम पूर्ण केले तर काही अडचण नाही परंतु जोपर्यंत येथील बसस्टँड चा अर्धवट रस्त्याचे काम ते पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत त्यांना टोल नाकाही आम्ही चालू करू देणार नाही . वेळ प्रसंगी उपोषण करू , आंदोलन करू अन्यथा रास्तारोको असा निर्धार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *