नांदेड –
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण आणि खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांपासून जिल्ह्यातील विविध पक्षांचे श्रीभक्त नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांच्या घरी काल गणेश चतुर्थी ता. २२ रोजी अत्यंत साधेपणाने लाडक्या बाप्पाचे आगमन झाले.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी कोणताही गाजावाजा न करता गणरायाची स्थापना केली.
कोरोनाचे संकट दूर होऊ दे – अशोक चव्हाण
नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली.
यावेळी कोरोनाच्या महामारीतून जगाची, देशाची मुक्तता होऊ दे, येत्या काळात कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन सर्वाना सुखाचे व समाधानाचे आयुष्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
नियमांचे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा – चिखलीकर
गणरायाच्या आगमनाने कोरोनाचे संकट दूर होईल. संसर्ग वाढणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे असे आवाहन खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
चिखलीकर यांच्या शहरातील वसंत नगर स्थित साई-सुभाष या निवासस्थानी गणेशस्थापना करण्यात आली.
यावेळी खा. चिखलीकर आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई चिखलीकर यांच्या हस्ते पूजा व आरती संपन्न झाली.