पुणे-दि.२५ (राजू झनके)
दोन दिवसांपूर्वी मराठी चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी धर्मनिरपेक्ष भारताच्या संविधानाच्या प्रतीवर धार्मिक प्रतीक असणाऱ्या गणपतीची मूर्ती बसविल्याने संपूर्ण भारतातील लोकशाहीवादी जनता चिडणे , संतापणे स्वाभाविकच होते.प्रवीण तरडे यांच्या ह्या कृतीचा जाहीर निषेध जागोजागी भारतीय जनतेकडून होऊ लागला. भारतीय संविधानावर अपार आदरभाव असलेली ‘ भिम आर्मी ‘ सारखी सामाजिक संघटना आक्रमक झाल्याने प्रवीण तरडे यांना माफी मागितल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी प्रवीण तरडे यांस फोन करून जाब विचारला असता तरडे यांनी माफी मागितली , इतकेच नव्हे तर माफीचा व्हिडीओ प्रसिध्द सुद्धा केला.पण असे करताना त्यांनी ‘मी जगभरातील दलित बांधवांची माफी मागतो’ असे विधान केल्याने पुन्हा भारतीय जनतेत संतापाची लाट आली.कारण भारतीय संविधान फक्त दलितांचे नसून ते भारतीयांचे आहे,
त्यामुळे तरडे यांनी तमाम भारतीयांची माफी मागणे अपेक्षित होते. त्यामुळेच भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे हे आज तडक पुण्यात दाखल झाले आणि त्यांनी पुणे पोलीस स्टेशन गाठून तरडे यांच्यावर कारवाईची मागणी केली.
याची कुणकुण लागताच प्रवीण तरडे हे पोलीस स्टेशनमध्ये पोहचले आणि त्यांनी तिथे सर्वांसमक्ष “माझ्या रक्तातच भारतीय संविधान भिनले असून , भारतीय संविधानाचा अवमान करण्याचा माझा काहीच हेतू नव्हता. माझ्याकडून चुकीने घोडचूक झाली असून मला माफ करा
, मी समस्त भारतीय जनतेची जाहीर माफी मागतो.तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची ही महान धरती असून ,तथागतांनी जगाला प्रेम आणि अहिंसा शिकविली असून , आपण त्याच तथागतांच्या महान भूमीत रहात असून चुकलेल्या व्यक्तीला क्षमा करणे हीच शिकवण बुद्धांनी दिली असून माझ्याकडून कळत-नकळतपणे जी महाचूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा”
असे भावनिक आवाहन त्यांनी अशोकभाऊ कांबळे यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये बोलताना केले असल्याची माहिती भिम आर्मीचे राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ह्यावेळी अशोकभाऊ कांबळे यांनी ‘अशी चूक पुन्हा करू नका , अन्यथा माफ करण्यात येणार नाही.अश्या चुका करणाऱ्यांना भिम आर्मी आपल्या स्टाईलने योग्य तो धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही’
असे बोलून वादावर पडदा पाडताना भिम आर्मीच्या वतीने प्रवीण तरडे यांस भारतीय संविधानाची महान प्रत भेट देऊन संविधानाच्या सन्मानाची आणि रक्षणाची शपथ घ्यावयास लावली. ह्यावेळी अशोकभाऊ यांचे सोबत भिम आर्मी पुणे जिल्हा (ग्रामीण) चे जिल्हाप्रमुख मा.दीपकरावजी देवरे हे सुद्धा उपस्थित असल्याची माहितीसुद्धा भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.