कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर ; १४ जुलै रोजी नांदेडला पुरस्कार समारोह

रामराव महाराज ढोक, डॉ. दीपक म्हैसेकर, शेखर देसरडा, डॉ. विश्वंभर चौधरी, कॅ. स्वाती महाडिक यंदाचे सन्मानार्थी

अशोकराव चव्हाण, जयंत पाटील, महेश कोठारे, आदिनाथ कोठारेंची उपस्थिती

नांदेड

मराठवाड्यातील प्रतिष्ठेचे कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित झाले असून, यंदाच्या सन्मानार्थींमध्ये रामायणाचार्य, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. रामराव महाराज ढोक, सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, सुप्रसिद्ध उद्योजक शेखर चंपालाल देसरडा, पर्यावरणवादी विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी आणि कॅ. स्वाती महाडिक यांचा समावेश आहे.

येत्या १४ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. कुसुम सभागृह, नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते आदिनाथ कोठारे यावेळी विशेष अतिथी असतील. कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी आज याबाबतची घोषणा केली.

‘दैनिक सत्यप्रभा’चा वर्धापन दिन तथा माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक सेवा, साहित्य, संस्कृती, महिला, क्रीडा, कृषी, प्रशासन, पत्रकारिता आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक नामवंतांना २००४ पासून हा पुरस्कार दिला जातो आहे. दरम्यान काही वर्षे हा उपक्रम खंडित झाला होता. मात्र, यंदापासून या पुरस्काराची नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार यापूर्वी मराठवाडा पातळीवर दिला जात होता. मात्र यावर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रातील मान्यवरांना हा पुरस्कार दिला जाईल.

यंदाचे विजेते म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक, मूळ नांदेडकर मात्र संपूर्ण राज्यात विविध पदे भूषवणारे कर्तबगार सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक व ‘डॉ. देसरडा ग्रुप ऑफ कंपनीज’चे व्यवस्थापकीय संचालक शेखर देसरडा, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सुप्रसिद्ध विचारवंत, समीक्षक डॉ. विश्वंभर चौधरी, पती कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर देशसेवेचे त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी लष्कराची परीक्षा व खडतर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यात दाखल होणाऱ्या कॅ. स्वाती महाडिक यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या गुरुवारी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, महापौर सौ. जयश्रीताई पावडे, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ.सौ. अमिताताई चव्हाण, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. अविनाश घाटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, शिवानंद महाजन, संदीप पाटील, बालाजी जाधव, सीए मनोहर आयलाने यांनी केले आहे.

कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराच्या यापूर्वीच्या विजेत्यांमध्ये प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने, ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर, कै. कुसुमताई रसाळ, नागनाथ फटाले, ज्येष्ठ समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ साहित्यिक फ.मु. शिंदे, लक्ष्मीकांत तांबोळी, ज्येष्ठ संपादन महावीर जोंधळे, सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ, प्रसिद्ध उद्योगपती प्रदीप धूत, सौ. ज्योती आंबेकर, नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वामनराव केंद्रे, ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार, साहित्यिक व माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले, संगीतकार डॉ. गुलाम रसूल, सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, पद्मश्री डॉ. यु.म. पठाण आदी नामवंतांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *