नांदेड, दि. 16 ः श्री क्षेत्र माहूर हे लाखो भाविकांचे श्रद्धेचे ठिकाण असून माहूरगडावरील रस्ते उत्तम दर्जाचे रहावेत, याकडे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लक्ष दिले आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी माहूरगडावरील रस्त्यांसाठी शासनाने 6 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे.
माहूरगडावरील रुई – गुंडवळ – तांदळा – दत्त मांजरी – दत्त शिखर या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी माहूर भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांनी तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती. हा रस्ता जिल्हा परिषदेअंतर्गत असल्यामुळे रस्ता दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध होण्यास अडचण जात होती. ही बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेतानाच रस्त्यांना दर्जोन्नती दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता वर्गीकृत झाल्यानंतर रस्ते व पूल परिरक्षण व दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्याच्या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार रुई – गुंडवळ – तांदळा – दत्त मांजरी – दत्त शिखर या रस्त्याची दुरूस्तीसाठी शासनाने सहा कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. सदरील रस्ता आता सिमेंट – काँक्रीटचा होणार असून यामुळे श्रीक्षेत्र माहूरगडावरील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्याकडे राज्याचे बांधकाम खाते व जिल्ह्याचे पालकमंत्री पद असताना माहूरगड विकासाकडे विशेष लक्ष पुरविले होते. माहूरगड विकासाचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गतच सहा कोटी रुपयांच्या कामांना आता मंजुरी मिळाली आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माहूरगड परिसरातील नागरिकांसह भाविकांनी आभार मानले आहेत.