Post Views: 56
नांदेड – देशाचे आजचे बालक हे केवळ भावी पिढी नसून ते देशाचे उद्याचे भविष्य आहेत. भारताला प्रगतीच्या दिशेने नेण्याची क्षमता आजच्या बालकांत म्हणजे उद्याच्या नेतृत्वात आहे हे ते जाणून होते. पं. जवाहरलाल नेहरू यांची बालकांप्रती संवेदनशील दृष्टी होती असे प्रतिपादन येथील स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले यांनी केले. ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, सूरज गोडबोले, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनिषा गच्चे, हैदर शेख यांची उपस्थिती होती.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १३३ वी जयंती जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत साजरी करण्यात आली. बालदिनानिमित्त मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी पं. नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भैय्यासाहेब गोडबोले यांनी धूपपूजन केले. त्यानंतर बालकांची आनंदयात्रा हा कार्यक्रम घेण्यात आला. बालसभेनेही नेहरु यांना अभिवादन केले. यात लक्ष्मण शिखरे, कृष्णा शिखरे, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे यांनी सहभाग नोंदविला. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी संतोष घटकार यांनी पार पाडली.