आयुक्तांच्या बेजबाबदारपणामुळे शहरात निर्जळी : तात्काळ पाणीपुरवठा करा अन्यथा महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढणार जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांचा इशारा

नांदेड: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या बेजबाबदार नियोजनामुळेच नांदेड शहरात गेल्या पाच दिवसापासून निर्जळी आहे. विष्णुपुरी धरण तुडुंब भरून असताना आणि आसनाचा पर्यायी उद्भव तयार असतानाही केवळ आयुक्तांच्या जबाबदार नियोजनामुळे शहरातील लाखो नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे . त्यामुळे आयुक्तांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा महानगरपालिकेवर घागार मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी दिला आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा बेजबाबदारपणा गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे . अनेक विभागात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. गुंठेवारीच्या नावाखाली शहरातील नागरिकांची प्रचंड लूट होत आहे . या सर्व बाबींकडे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. केवळ टक्केवारी वसूल करण्यात व्यस्त असलेले महानगरपालिका प्रशासन म्हणजे आवो चोरो बांदो भारा आधा तुम्हारा आधा हमारा अशी परिस्थिती झाली आहे.

शहरात व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसतानाही नळपट्टी वसुलीचा तगादा मोठ्या प्रमाणात लावला जातो . नळ कनेक्शन काढण्याची धमकी दिली जाते. महानगरपालिका मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले असून आयुक्त केवळ मुंबई दिल्ली वाऱ्या करण्यात आणि काही विशिष्ट लोकांची मर्जी सांभाळण्यात व्यस्त आहेत . गोरगरीब जनतेला वेठीस धरले जात आहे . मोठ्या धांडाना सुट तर सामान्य लोकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो असा केबिलवाना प्रकारही सुरू आहे . त्यात आता गेल्या पाच दिवसापासून नांदेड शहरात निर्जळी आहे. विष्णुपुरी धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या नावाखाली शहरात पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वास्तविक असा पाणीपुरवठा खंडित करीत असताना महानगरपालिकेने शहरातील जनतेला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे अथवा किंवा त्याची माहिती देणे आवश्यक होते . दुर्दैवाने आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या नियोजनाखाली असलेल्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नांदेडकरांना कोणती पूर्व सूचना दिली नाही. शिवाय पाणीपुरवठा कधी होणार याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

विष्णूपुरी धरणाच्या पाणीपुरवठ्यासाठी जेव्हा अडचण निर्माण होते अथवा पाणीपुरवठ्यासाठी काही समस्या निर्माण होते अशावेळी आसना नदीवरून पर्यायी पाणीपुरवठाची व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. नांदेड उत्तरसह शहरातील अनेक भागात या पर्यायी उद्भव मधून पाणीपुरवठा केला जातो . यापूर्वी तसा पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे. परंतु दुर्दैवाने आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांना आसनाच्या पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेचाही उपयोग करता येऊ नये याहून मोठे दुर्दैव कोणते असा प्रश्नही जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी उपस्थित केला आहे . त्यामुळे नांदेडकरांच्या संयमाचा आयुक्तांनी अधिक अंत न पाहता तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *