मराठी पत्रकार संघाच्या वतीने मयत संजय कंधारकर यांच्या कुटूंबियास आर्थिक मदत

 

नांदेड, :- पत्रकार संजय कंधारकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले .स्व. कंधारकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटूंबियावर हालाखीची आर्थिक परिस्थिती ओढवली आहे.अशा बिकट परिस्थितीत त्यांच्या कुटूंबियांना मदतीचा हातभार लागावा,या उद्देशाने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक मदत देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यात आले.

मागच्या आठवड्यात दि.3 रोजी स्व. कंधारकर हे त्यांच्या मुलास बारावीच्या परीक्षेसाठी सोनखेड येथील केंद्रावर सोडायला गेले होते . येथून मोटारसायकलने येत असताना कंधार-लोहा रोडवर त्यांच्या दुचाकीला एका चारचाकी वाहनाने धडक दिली.यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

स्व.संजय कंधारकर यांच्या निधनाने कुटूंबियांची आर्थिक स्थिती नाजूक झाली असून दोन मुली व एक मुलगा शिक्षण घेत आहेत.त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीचा हातभार लागावा,यासाठी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकार मंडळींना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले.यातून दोन दिवसात जमा मदतीची रक्कम शनिवार दि.11 रोजी स्व.कंधारकर यांच्या कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आली.डिजिटल मिडिया नांदेड शाखेनेही मदत निधीसाठी सहकार्य केले.

यावेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्व.संजय कंधारकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सर्व पत्रकाराच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,विभागीय संघटक प्रकाश कांबळे तथा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी , सरचिटणीस राम तरटे यांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करत भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तपरी मदत करण्याचा विश्वास त्यांच्या कुटूंबियांना दिला.
ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शेवडीकर, अनिकेत कुलकर्णी, धोंडोपंत विष्णुपुरीकर आदींनी निधी संकलनासाठी पुढे येऊन सहकार्य केले.भविष्यात अशा प्रसंगी मदत करण्यासाठी एक धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने त्यांनी सूचनाही केल्या.
यावेळी पत्रकार फुलाजी गरड, लक्ष्मण भवरे,संभाजी सोनकांबळे, रविंद्र संगनवार, प्रल्हाद कांबळे, प्रल्हाद लोहेकर, जयपाल वाघमारे, सुरेश काशीदे, संघरत्न पवार,किरण कुलकर्णी, करणसिह बैस,पंकज उबाळे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *