नांदेड – शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली आणि औरंगजेबाला मदत करायची कोणीही हिंमत करु नये यासाठी संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना जोरदार धडा शिकवला. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. अनेक संकटांना तोंड देत छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचे रक्षण केले असे प्रतिपादन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केले. ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, कैलास गोडबोले, साहेब शिखरे, हैदर शेख, मनिषा गच्चे, हरिदास पांचाळ आदींची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी जवळा येथे बलिदान दिन म्हणून साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आणि संतोष अंबुलगेकर यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर विद्यार्थ्यांनीही प्रतिमेचे पुष्पपूजन आणि धूपपुजन केले. यावेळी बोलतांना ढवळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोष्ठ्या कष्टानं उभं केलेलं स्वराज्य जोपासताना संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याला साजेसं कर्तुत्व केलं. मात्र अचानक झालेल्या गद्दारीनं छत्रपती संभाजीराजांना कैद झाली आणि पुढे त्यांच्यावर अगणित अत्याचार झाले, मात्र त्या शारिरीक जखमा हसत अंगावर झेलत, आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी मुघलांसमोर हार मानली नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संतोष घटकार यांनी मानले.