कंधारः- (विश्वांभर बसवंते)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा होय ! आणि याच दिवसापासून हिंदू नवीन वर्ष सुरू होते. त्याचबरोबर सर्व ऋतूंचा राजा वसंत ऋतूचीही सुरुवात होत असल्याने या महिन्याला चैत्र असे नाव देण्यात आले आहे. हा हिंदू वर्षाचा पहिला दिवस असल्याने कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ करून या दिवसाला फार महत्त्व दिले जाते. याच दिवसाचे औचित्य साधून ऊसतोड कामगारांचा साडी-चोळी, दस्ती-टोपी देऊन व गोडधोड पक्वान्न बनवून, घास भरवून सपत्नीक सन्मान करत माणुसकी जपत असल्याचे काल पहावयास मिळाले.
दसरा व दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करून ग्रामीण भागातील विशेषतः वाडी – तांड्यावरील मजूर हे आपल्या कुटुंबाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन गाव, तालुका व राज्य सोडून परराज्यात ऊस तोडणीसाठी रवाना झाली होते. ऊन-पाऊस, थंडी-वारा, ना एका ठिकाणी कायमचा निवारा ! या कशाचीही तमा न करता साधारणतः पाच ते सहा महिने हे ऊसतोड कामगार अनेक संकटावर मात करत, काबाडकष्ट करून घेतलेल्या अग्रीम (उचल) रकमेची सन्मानाने परतफेड करून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्य सजावट करून एखाद्या लग्न समारंभ कार्यक्रमासाठीच चालू लागल्यागत अगदी आनंदात आपापल्या गावाकडे जात असल्याचे दिसून येत होते.
हेच ऊसतोड कामगार मंगळवार दि.२१ मार्च रोजी सोमवारी कंधार तालुक्यातील फुलवळ येथे औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात थांबून गावाकडे चालल्याचा आनंद साजरा करत होते.
या आनंदी ऊसतोड कामगारांकडे जाऊन अधिक चौकशी केली असता, त्यातील एक ऊसतोड कामगार म्हणाला, “साहेब, हा आमचा आनंद म्हणजे ऊसतोड कामासाठी घेतलेली उचल काम करून पूर्ण फेड झाली आहे. त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यात आम्हा कामगारांना कोणतीही दुखापत झाली नाही. आम्ही आज गावाकडे सुखरूप जात आहोत, याचा आनंद आम्हाला होत आहे. आम्ही केलेल्या कामाची कदर करत आमचा ऊसतोड मुकदम आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज या मोकळ्या मैदानात गुढीपाडवा सणानिमित्त आम्हा कामगारांसाठी ‘गोड जेवण देऊन’ आमचा साडी-चोळी, दोस्ती टोपी देऊन सन्मान करत आहेत व आपले कष्टकऱ्यांचे ऋणानुबंध भविष्यात असेच कायम रहावेत, अशी ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत.” असे भावनिक उद्गगार ऊसतोड कामगारांनी बोलवून दाखविले.
आजच्या या धावपळीच्या व धगधगीच्या जीवनात विभक्त कुटुंब पद्धती वडिलोपार्जित असलेल्या संपत्तीच्या वादावरून सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी होत आहेत, तर फुटभर बांधासाठी शेजारी – शेजारी एकमेकांवर कुऱ्हाडी उगारत आहेत. भाव – भावकीमध्ये वाद- विवाद होऊन माणुसकीला छेद दिला जात असतानाच, एक ऊसतोड कामगार दुसऱ्या ऊसतोड कामगाराचा सन्मान करून अनेक जाती-धर्मामधील आपल्या कामगार बांधवांना एकत्र करून माणुसकीच नवं नात निर्माण करत आहेत. म्हणून या गरीब कष्टकरी ऊसतोड कामगारांमध्ये आज माणुसकीचा झरा वाहत असल्याचे दिसून येत आहे. या कामगारांचा आदर्श इतरांनी घेणे ही काळाची गरज आहे.