नांदेड, दि. २३ मार्च २०२३:
डॉ. शंकरराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हितास्तव दूरदृष्टीने उभारलेल्या विष्णुपुरी प्रकल्पातून नांदेडसह विविध पाणी पुरवठा योजनांसाठी राखून ठेवलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी या प्रकल्पातून पाणी उपलब्ध होत नाही. जर हा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर लोहा व कंधार तालुक्यात प्रस्तावित चार साठवण तलाव तात्काळ पूर्ण करणे गरजेचे असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून विधानसभेत विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. यास सकारात्मक उत्तर देत चार साठवण तलाव निर्मितीस प्राधान्य देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
विष्णुपुरी प्रकल्पाबाबत आ. शामसुंदर शिंदे यांनी पंप दुरुस्तीसंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर अशोकराव चव्हाण यांनी एक उपप्रश्न उपस्थित करत या प्रकल्पासंदर्भातील अनेक महत्वाच्या बाबी आज विधानसभेच्या निदर्शनास आणून दिल्या. ते म्हणाले की, या प्रकल्पाची साठवण क्षमता साठवण क्षमता ८३.५५ दलघमी असून, बिगर सिंचनासाठी तब्बल ५६.९४ दलघमी पाणीसाठा आरक्षीत आहे. त्यामध्ये नांदेड-वाघाळा महानगर पालिकेसाठी ४३.०४ दलघमी, नांदेड औद्योगिक वसाहत व साखर कारखान्यांसाठी ११.६१ दलघमी तर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांसाठी २.२९ दलघमी जलसाठ्याचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पात शेतीसाठी केवळ २६.६१ दलघमी पाणी शिल्लक राहते. या शिल्लक साठ्यातून शेतीत पीक घेण्यासाठी पाणी पाळ्या देऊ शकत नाही. यावर पर्याय म्हणून लोहा व कंधार तालुक्यातील डोलारा मध्यम प्रकल्प, गुंडा (उमरा) साठवण तलाव, हिंदोळा साठवण तलाव आणि लाटखुर्द साठवण तलाव हे नवीन प्रकल्पाचे काम हाती घेणे आवश्यक आहे.
पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात नवीन प्रकल्पांची आवश्यकता होती. मात्र, नवीन प्रकल्प उभारण्यासाठी गोदावरी खोऱ्यात पाणीच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. वास्तविकतः गोदावरी खोऱ्यामध्ये १९.२९ अब्ज घनफुट पाणी उपलब्ध असून, आता त्याबाबतचा धोरणात्मक निर्णयही घेण्यात आला आहे. या पाण्यातून जिल्ह्यात १४ नवीन प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यापैकी डोलारा मध्यम प्रकल्प व गुंडा (उमरा), हिंदोळा, लाटखुर्द साठवण तलाव विष्णुपुरीच्या लाभक्षेत्रात येतात. या प्रकल्पांच्या मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ते मार्गी लावल्यास पाण्याची वाढती मागणी पूर्ण होऊ शकेल. त्याचप्रमाणे निर्माणाधीन किवळा साठवण तलाव प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण केल्यास तिथूनही पाणी उपलब्ध होईल, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
या मागणीला उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले की, लोहा व कंधार तालुक्यातील चार प्रकल्प पूर्ण केले जातील. हिंदोळा आणि लाटखुर्द साठवण तलावाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले असून, ते काम प्राधान्याने केले जाईल. डोलारा आणि गुंडा साठवण तलावाबाबत काही मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्याचा निपटारा झाल्यानंतर त्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.