नवी मुंबई ;
नवी मुंबईतील खारघर येथे १६ एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्रभूषण पुरस्कार-२०२२ प्रदान सोहळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज आढावा घेतला.
खारघरच्या कॉर्पोरेट पार्क मैदानात आयोजित कार्यक्रमात आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, माझ्यासह सर्वांनी झोकून देऊन काम करूया, इतिहासात नोंद घेतली जाईल, ‘न भूतो न भविष्यती’ असा हा कार्यक्रम करुया, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
पुरस्कार प्रदान सोहळ्याचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची आणि प्रशासनाची ही सर्वस्वी जबाबदारी आहे, त्यांना ‘श्री’ सदस्य सहकार्य करण्यासाठी सज्ज आहेत. कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीतील समन्वय राखण्यासाठी नेमावा. सर्वच घटकांनी जबाबदारीचे भान ठेवून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी. अंदाजे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अत्यंत काळजीपूर्वक काम करावे, असे सांगून स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे वाहनतळाचीही योग्य ती व्यवस्था करावी, पोलिसांबरोबर वाहतूक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे, पस्तीस ते चाळीस हजार वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता, त्यामुळे त्याबाबतही योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, लोकांची कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यवस्थित काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांची विशेष जबाबदारी आहे, आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व तयारी करावी. काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी, शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सज्ज होऊया, या दिमाखदार कार्यक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पूर्वतयारी आढावा बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री भरत गोगावले, प्रशांत ठाकूर महेश बालदी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचेसह रायगड, ठाण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, ठाणे, पनवेल, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त. आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्वतयारी बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी खारघर कॉर्पोरेट पार्क मैदानाला भेट देऊन कार्यक्रम स्थळाची आणि तेथील सुविधांची पाहणी केली.