वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ;कंधार तालुक्यातील पांगरा येथील घटना

कतरे व्हि के पांगरेकर
कंधार प्रतिनिधी ….

तालुक्यातील पांगरा येथील शंकर धोंडीबा घोरबांड वय ३१ वर्षे या तरण्याबांड शेतकऱ्याचा दि.१९ एप्रिल २०२३ रोज बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडल्यामुळे पांगरा गावावर शोककळा पसरली आहे. सदर मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी कोमल, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

सध्या हळद पिक काढणीला वेग आला असून हळद उत्पादक शेतकरी रात्रीचा दिवस करून आपल्या कुटुंबातील लहानापासून ते मोठ्या सदस्यापर्यंत शेतावर जाऊन हळद काढणी साठी जीवाचे रान करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु काल नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याचा बळी घेतल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‌ दिवसेंदिवस बदलत चाललेले नैसर्गिक वातावरण आणि त्यातून उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती यामुळे कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी होऊन शेती पिकाचे तर नुकसान होतच आहे परंतु जीव मुठीत घेऊन शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या नैसर्गिक आपत्तीत स्वतःचा जीव गमवावा लागत आहे.

कंधार तालुक्यातील पांगरा येथील हळद उत्पादक शेतकरी शंकर धोंडीबा घोरबांड यांनी हळद पीक शिजवून सुकविण्यासाठी शेतात आखाडा केला होता. दि.१९ एप्रिल २०२३ रोज बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाल्याने सुकवण्यासाठी ठेवलेली हळद एकत्र गोळा करून झाकून ठेवण्यात व्यस्त असलेल्या शंकर घोरबांड यांच्यावर वीज कोसळली आणि क्षणात त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही बाब कंधार तहसील कार्यालयात कळताच मंडळ अधिकारी सुजलेगावकर व तलाठी नारमवाड यांनी तात्काळ पांगरा येथील घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पुढील कार्यवाहीसाठी सदरचा पंचनामा आणि अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *