वृक्षराजींच्या सान्निध्यात मुक्त वाचनालय उपक्रमास प्रारंभ

 

नांदेड – पुस्तक हे मस्तक घडविण्याचे कार्य करीत असते. वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावत असतात. समाजात वाचन संस्कृतीचा परिपोष होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शालेय पातळीवर गोष्टींचा वार शनिवार, वाचन प्रेरणा दिवस, खाऊ प्रकल्प, लेखन वाचन हमी कार्यक्रम, वाचनालय शाळेच्या दारी असे विविध उपक्रम राबविले जातात.या उपक्रमांचे उद्देश वेगवेगळे असले तरीही वाचक निर्माण करणे हा एक समन्वित उद्दिष्ट आहे.

 

 

टीव्ही, मोबाईल, आॅनलाईन गेम च्या जमान्यात वाचकही अदृश्य होत चालला आहे आणि वाचनाची आवडही कमी होत चालली आहे. आता सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत. परंतु सुट्टया २ मे पासून असल्या तरी पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होण्यापर्यंतच्या या कालावधीत वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृतीची रुजुवात शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांत व्हावी यासाठी जवळा देशमुख येथील शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीत अनोखा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

 

शालेय परिसरात वृक्षराजींच्या सान्निध्यात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सदस्य आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनिषा गच्चे यांच्या सहकार्याने मुक्त वाचनालय हा दीड तासांचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील प्रांगणात झाडांना दोरी बांधून त्यास गोष्टींची, शूरविरांची, थोर महापुरुषांची चरित्रे, वैज्ञानिकांची पुस्तके आदी विविध प्रकारची पुस्तके डकविण्यात येतात.

 

विद्यार्थी झाडांच्या थंड सावलीत बसून सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या उपक्रमात सहभागी होत कोणतेही आवडीचे पुस्तक घेऊन वाचत बसतात. तसेच वाचन झाल्यावर ते परत ठेवून देतात. ही प्रक्रिया सतत दीड तास चालते, असे या उपक्रमाचे स्वरूप असून शाळेतील विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थीही यात सहभागी होत आहेत. या उपक्रमाचे स्वागत केंद्रप्रमुख नागोराव जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक आनंदा नरवाडे, शिक्षणविस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, सरपंच कमलताई शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले आदींनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *