मुखेड: ( दादाराव आगलावे )..
अनेक शिक्षक अध्ययन सोपे कसे होईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात व वेगवेगळ्या हातोटी वापरून अल्पावधीतच ते विद्यार्थीप्रिय होतात अशातीलच एका शिक्षकाचे नाव आहे अविनाश तलवारे.
मुखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहशिक्षक अविनाश तुकाराम तलवारे हे नियत वयोमानानुसार दिनांक ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले.त्या निमित्ताने शाळेच्या वतीने त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विश्वनाथ राठोड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सं.स.मस्कले, केंद्रप्रमुख एस.एस.करेवाड,य.ह.दिक्षित, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता राठोड आदींची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सं.स.मस्कले म्हणाले की, इंग्रजी विषयाचे ज्ञान सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रामाणिक काम अविनाश तलवारे यांनी केले असून शाळेचे नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात अविनाश तलवारे यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगीतले. शाळेच्या वतीने अविनाश तलवारे व त्यांच्या पत्नी सौ. सुनीता तलवारे, वडील आदर्श शिक्षक तुकाराम तलवारे आणि आई शांताबाई तलवारे यांना कपडे रुपी भेट देऊन निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले हायस्कूल बाबानगर नांदेड चे माजी मुख्याध्यापक प्रमोद शिरपूरकर यांनी अविनाश तलवारे यांच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचे कौतुक करत त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक प्रा.डॉ. सुशील प्रकाश चिमोरे उदगीर यांनी अविनाश तलवारे यांचे सामाजिक चळवळीत मोठे योगदान असून त्यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ “लसाकम” च्या माध्यमातून समाज प्रबोधन व परिवर्तनाची चळवळ गतिमान केल्याचे यावेळी सांगितले.
अविनाश तलवारे निरोपाला उत्तर देताना म्हणाले की,सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने माझ्या जीवनात अनेक आनंदाचे आणि वैभवाचे क्षण दिले असून संस्थेचे अध्यक्ष, सचिव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता राठोड आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी मला नेहमीच प्रोत्साहन देत चांगले काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यासोबतच शाळेच्या माध्यमातून मला तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर उत्तम पद्धतीने साधन व्यक्ती म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल अविनाश तलवारी यांनी संस्थेचे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी केंद्रप्रमुख एस. एस.करेवाड बोलताना म्हणाले की अविनाश तलवारेसर हे प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ, संयमी आणि प्रज्ञा प्रतिभा संपन्न विषय तज्ज्ञ शिक्षक असून त्यांनी आजपर्यंत विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्ष समारोप करताना माजी मुख्याध्यापक विश्वनाथ राठोड म्हणाले की, अविनाश तलवारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिज्ञा आणि प्रतिभेचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य विचारवंत, साहित्यिक, लेखक आणि शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांना शाळेत आणून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास केल्याचे गौरवोद्गार विश्वनाथ राठोड यांनी काढले. यावेळी चंद्रशेखर स्वामी, माजी मुख्याध्यापिका सुमन जाधव, बी.जी.वडले आणि अविनाश तलवारे यांचे चिरंजीव वैभव तलवारे तसेच विद्यार्थिनी कु. संघर्षी वाघमारे, पुनम श्रीरामे, पूनम सोनकांबळे, अनोखी जांगडे, आपले विचार मांडले. निरोप समारंभाचे गीत सौ. सुशीला कुंचलीकर यांनी गायले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ.विजया वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन एम.पी.श्रीरामे यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शाळेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अविनाश तलवारी यांचा मित्र संपर्क दांडगा असल्यामुळे अनेकांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांना सेवानिवृत्तीचा निरोप दिला. अविनाश तलवारे यांच्या कार्यकाळातील उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किसनराव राठोड, सचिव गंगाधरराव राठोड, आमदार कर्मवीर किशनराव राठोड, जि. प. सदस्य संतोषभाऊ राठोड, प्राचार्य हरिदास राठोड, मुख्याध्यापक शिवाजी डावखरे, प्राचार्य सोपानराव वाघमारे, प्राचार्य दिलीप गायकवाड, मुख्याध्यापक समशोद्दीन शेख, मुख्याध्यापक नागनाथ कोयलकोंडे, मुख्याध्यापक संदीप गेटकेवाड, मुख्याध्यापक आर.डी. राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.