कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील पेठवडज गावातील अवैध दारु विक्रीविरोधात महिलांसह ग्रामस्थांनी घेराव घातला असून, यासंदर्भात महिला ग्रामसभेत ४ मार्च रोजी अवैध दारु विक्री बंद करण्याचा ठराव ही पारित करण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता गायकवाड या होत्या.
या सभेमध्ये व्यसनमुक्तीच्या विषयावर चर्चा घडवून गावात गत पाच वर्षापासून होत असलेली अवैध देशी, विदेशी दारु विक्री बंद करण्यात यावी, ही एकमुखी मागणी महिला ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
दारुमुळे तरुण पिढी व्यसनाधीत झाली आहे. दारुच्या नशेत गावातील तीन तरुण मृत्यू पावले तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावातील दारु विक्री तत्काळ बंद करावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. अवैध दारुसंदर्भात यापूर्वी देखील गावातील महिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. परंतु त्यावर ठोस कारवाई झाली नाही.
अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिला ग्रामसभेत गावातील सर्वच महिला एकवटल्याचे समोर आले आहे. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.