पॅरा अथेलिटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड ….! पॅरिस येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू

 

नांदेड- दि.२३ पॅरिस येथे येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरा अथेलिटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी नांदेडची भुमिकन्या भाग्यश्री माधवराव जाधव हिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू ठरली आहे.

नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिने दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट केली आहे.
दुबई येथे झालेल्या फाजा व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.
बंगळूरू येथे ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
नोव्हेंबर 2022 मध्ये पोर्तुगाल येथे जागतिकस्तरावर झालेल्या आयवॉज २०२२ या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक क्रीडा प्रकारात रौप्य व कास्य पदक मिळवून भारताबरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक केला.
मार्च 2023 मध्ये उत्तर आफ्रिकेतील मोरक्को या देशात वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स २०२३ या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व करीत कास्य पदक पटकावले आहे.
बंगळूरु येथे दि.४ ते ८ मे या कालावधीत झालेल्या पाचव्या भारतीय ओपन पॅरा अथेलिटिक्स इंटर नॅशनल चॅम्पिअनशीप-2023 या स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांनी गोळाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
पॅरिस येथे दि.८ जुलै ते दि.१७ जुलै या कालावधीत पॅरा अथेलिटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव हिची निवड पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे क्रीडा आयुक्त यांना एका पत्राद्वारे तसे कळविले आहे.या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झालेली ती नेहमी प्रमाणे महाराष्ट्राची एकमेव खेळाडू ठरली आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राची शान कायम राखली आहे.
अवघ्या सहा वर्षाच्या क्रीडा प्रवासात भाग्यश्री जाधव यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण (बंगळूरु), बेसिक प्रशिक्षक श्रीमती पुष्पा (बंगळूरु) विशेष प्रशिक्षक मयूर रसाळ, सहाय्यक प्रशिक्षक रविंद्र पंगाल व गुरुबंधु पालक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *