नांदेड – आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना समजून घेतल्यास निश्चितच आपली सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक प्रगती होऊ शकते. यासाठी शाहू महाराजांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक तथा जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी केले. ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सहशिक्षक संतोष घटकार, आनंदा गोडबोले, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, तुकाराम ननुरे, चंद्रकला शिखरे, हैदर शेख, मनिषा गच्चे आदींची उपस्थिती होती.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जवळ्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बोलताना ढवळे म्हणाले की, सध्याच्या काळात छोट्याशा कारणावरून दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. लोक अधिकाधिक हिंसक होऊन अविचाराने वागत आहेत. याचे परिणाम चिमुकल्यांवर होत आहेत. त्यांच्यावर जातीभेदाचे अमंगल संस्कार समाजातूनच होत आहेत. हे थांबविण्यासाठी शाहू महाराजांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.