कंधार: ( विश्वंभर बसवंते )
कंधार तालुक्यातील फुलवळ पासून पश्चिमेस २ किमी.अंतरावर असलेल्या मौजे कंधारेवाडी येथील तरुण युवक आकाश नामदेव कंधारे वय १८ वर्ष यांच्या वर रानडुक्कराने अचानकपणे हल्ला केला असून, सदर रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. अशा घटना अनेक ठिकाणी वारंवार घडत असल्यामुळे वनविभागाने अशा गंभीर बाबीची वेळीच दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
घटनेची माहिती अशी की आकाश कंधारे हे रविवार सुट्टीचा दिवस म्हणून आईवडिलांना मदत होईल या उद्देशाने सकाळीच आपल्या मालकीच्या शेळ्या चारावण्यासाठी कंधारेवाडी शिवारात, पानशेवडी रस्त्याच्या लगत आपल्या शेळ्या घेऊन गेले असता, दुपारी १२ वाजता च्या सुमारास अचानकपणे रानडुक्कर भरधाव वेगाने धावत येऊन अंगावर झडप घालत आकाश च्या मांडीवर व चेहऱ्यावर डोळ्याच्या बाजूला जबर जखमी केले . तेवढ्यात घाबरून गेलेल्या आकाश ने आरडाओरडा केला असता ,शेजारी शेतात असलेल्या शेतकरी , कामगारांनी आकाश च्या दिशेने धाव घेतली आणि त्या रानडुक्कराच्या ताब्यातून त्याला मुक्त केले.
त्यानंतर आकाश ला कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी विष्णुपुरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे आकाश चे चुलते सदाशिव मारोती कंधारे यांनी सांगितले. पेरणीचे दिवस असल्यामुळे सध्या यासह जंगली प्राण्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .