अतिवृष्टीग्रस्तांची ना भेट ,ना सांत्वन! प्रशासनाच्या कोडकौतुकातून निष्क्रियता झाकण्याचा खासदारांचा प्रताप: अमरनाथ राजूरकर

 

नांदेड, दि. ३०:

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान तर झालेच; शिवाय घरे-दुकानांमध्ये पाणी शिरल्याने हजारो नागरिक अडचणीत आले असताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पूरग्रस्त वसाहती, बांधावर जाऊन सांत्वन करत शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत सर्वांना धीर दिला. मात्र विकासात शून्यवत कामगिरी असलेल्या जिल्ह्याच्या खासदारांनी प्रशासनाचे कोडकौतूक करून स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा प्रताप केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केली आहे.

या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राजकीय पक्ष कोणताही असो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व इतर समाजघटकांचे प्रश्न सोडवणे हेच लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असते. यासाठीच मतदार त्यांना विधानसभा तसेच लोकसभेत काम करण्याची संधी देतात. मात्र, मतदारांचा भ्रमनिरास करणाऱ्यांना जनता योग्यवेळी त्यांची जागाही दाखवते. हे चित्र आपण अनेकदा अनुभवले आहे. मागील ८-१० दिवसात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले. प्रारंभी पाऊसच नाही आणि नंतर अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात फसलेल्या शेतकऱ्यांचा किल्ला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विधानसभेत लढवत काही मागण्या मार्गी लावून घेतल्या. तसेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही ते नांदेड येथे मुक्कामी थांबले. केवळ आपला मतदारसंघच नाही तर देगलूर, मुखेड तसेच नांदेड शहरातील विधानसभा मतदारसंघांची पाहणी करून त्यांनी नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अतिवृष्टीग्रस्तांच्या वेदनेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला.

उशिरा सुचलेले शहाणपण!
दुसरीकडे खासदारांनी मात्र जिल्ह्यावर भीषण संकट ओढवले असतानाही दिल्लीलाच राहणे पसंत केले. खरे तर गेल्या आठवड्यात संसदेचे अधिवेशन मणिपूरमधील हिंसाचारावरून दररोज बंद पडत होते. असे असताना खासदार नांदेडकरांच्या कोणत्या व्यथा मांडायला दिल्लीत तळ ठोकून बसले होते? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे आमदार नागरिकांना धीर देण्यात गुंतले असताना जीवाची दिल्ली करणारे खासदार आता नाईलाजास्तव फिरू लागले आहेत. हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होते आहे.

दिल्लीहून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर खासदारांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे भरीव मागण्या करण्याऐवजी प्रशासनाचे कोडकौतूक व मनपावरील काँग्रेसवर राजकीय टीका करण्यातच धन्यता मानली. राजकीय व्यासपिठावर प्रत्येकाने आपली वैचारिक भूमिका मांडावी. मात्र, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व कष्टकरी अडचणीत असताना त्यांच्या मदतीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न अपेक्षित असताना अतिवृष्टीग्रस्तांना काही द्यायचे नाही, इतरांवर टीका-टिप्पणी करून आपली निष्क्रियता झाकायची, हा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे अमरनाथ राजूरकर पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *