मानससेवा हीच उच्च दर्जाची ईश्वरसेवा – सद्गुरू साईनाथ महाराज माहुरकर सप्तरंगी साहित्य मंडळाने घेतला साईनाथ महाराजांच्या अभिनंदनाचा ठराव!

शेकडो अतिवृष्टीग्रस्त कुटुबांना आनंद दत्तधाम आश्रमाकडून मदतीचा हात

नांदेड – माणसाची सेवा म्हणजेच मानससेवा हीच उच्च दर्जाची ईश्वरसेवा आहे, कष्टाला तथा परिश्रमालाच मोक्षाचे फळ लागते बाकी सर्व अंधश्रद्धा आहेत. माणूसच ईश्वरसाधनेच्या केंद्रस्थानी आहे असे प्रतिपादन सद्गुरू साईनाथ महाराज माहुरकर यांनी केले. ते सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडूरंग कोकुलवार, वरिष्ठ सल्लागार अनुरत्न वाघमारे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, शंकर गच्चे, वाई बाजारचे पोलीस पाटील संतोष सोनुले, शेतीनिष्ठ शेतकरी सुभाष पाटील टेंभीकर , व्यवस्थापक सुधीर जाधव आदींची उपस्थिती होती.

 

येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने माहूर तालुक्यात आनंद दत्तधाम श्रीक्षेत्र माहूरगड यांच्याकडून अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या कुटुबांस जीवनोपयोगी वस्तूंची कीट देऊन मदत केली जात आहे. यात पाच किलो गहू , पाच किलो साखर, तेल, साबण, धुण्याचा सोडा अशा जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात येत आहे. हडसनी येथील ५३ तसेच टेळकी, नेर येथील १२३ अशा विविध गावांमधील शेकडो कुटुंबांना मदत देण्यात येत आहे. यापूर्वीही आनंद दत्तधाम आश्रम श्रीक्षेत्र माहूरगड चे मठाधिपती दत्तभक्त परायण सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान, शिक्षण परिषद, शिष्यवृत्ती परीक्षा निवासी विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र, शिक्षक साहित्य संमेलन, अधिकमासानिमित्त चूल बंद भोजनदान आदी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

तिसऱ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैठकीत साईनाथ महाराजांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. या बैठकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आश्रमाकडून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिसरे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन घेण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरले. प्रास्ताविक अनुरत्न वाघमारे यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभार सुधीर जाधव यांनी मानले. यावेळी सेवेकरी अर्जुन शिंदे रोही पिंपळगाव, बालाजी जाधव दिघीकर, गजानन मुकाडे, लक्ष्मण ढगे, अविनाश हुलकाने, वैभव खराटे आदींनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *