अण्णाभाऊचे लोकसाहित्य सदैव प्रेरणादायी

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात असलेल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला .त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालुबाई असे होते आणि त्यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे होते, पण लोक त्यांना अण्णाभाऊ या नावाने सर्वत्र ओळखले जात असत,
अण्णाभाऊ यांचे साहित्य परिवर्तनवादी आहे, समाजातील दलितांच्या समस्या मांडून त्यांनी समाजप्रबोधन केले.

 

साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या अंगच्या लेखन कौशल्याने देशात आणि परदेशात प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या शिक्षणाचा अभ्यास केला तर ते फक्त दीड ते दोन दिवस शाळेत गेले होते. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी हा लेखन प्रपंच……
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुंबई येथील चिरागनगर सारख्या झोपडपट्टीत राहून विपुल व दर्जेदार साहित्याचे लेखन केले पण त्यांच्या वाट्याला मात्र दारिद्र्याचे, हालाखीचे, व उपेक्षितांचे जीवन वाट्याला आले, अण्णाभाऊच्या वाड;मयीन कार्याचे मूल्यमापन व्यवस्थित झाले नाही ते नेहमी दुर्लक्षितच राहिले.जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो, माझा माझ्या देशावर जनतेवर, नीतीच्या संघर्षावर, अढळ विश्वास आहे.आपला देश सुखी व समृद्ध व्हावा येथे सर्वत्र समता नांदावी या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे असे मला दररोज स्वप्न पडत असतात ती मंगल स्वप्न पाहत पाहत मी लिहीत असतो.

केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते, ते सत्य -हदयाने मिळवावे लागते, डोळ्याने सर्व दिसते पण ते सर्व साहित्यिकांना साथ देत नाही उलट दगा मात्र देते, माझा असा दावा आहे की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरली आहे त्या दलितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने व निष्ठेने मी चित्रित करणार आहे व करीत आहे सत्तू भोसले, फकीरा, बरबाद्या कंजारी, नाथा पाटील
,विष्णुपंत कुलकर्णी, व्यंकू माकडवाला, गोरी मेरी, जमीनदार, सावकार, गवळण म्हणणाऱ्या गवळणी व जनता ही तमासगिरीण असे कितीतरी माणसे आपल्या साहित्यातून त्यांनी अजरामर केली. दलित आणि श्रमिकांच्या उन्नतीसाठी शाहिरी, कथा ,कादंबरी वगनाट्य, पिढीचे जगणे, कविता लावणी लिहू लागले. नाटके, चित्रपटे, पोवाडे हे सर्व लिखाण त्यांच्या नावावर आहे. माणसातील माणूसपण त्यांनी जपले सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या जीवनातील व्यथा वेदना लेखणीतून मोकळ्या केल्या. अण्णाभाऊ साठे हे एक झंझावाती व्यक्तिमत्व होते, चैनेचे सुख वस्तुचे जीवन ते कधीच जगले नाहीत, दीनदुबळ्याच्या जगातच कायम वास्तव्य केले. आणि त्या जगाचे प्रखर वास्तव्य त्यांनी त्यांच्या साहित्यातून समाजासमोर मांडले, उपेक्षित आणि प्रस्थापितांचा संघर्ष हा तर दलितांच्या पाचवीलाच पुजला होता जातीय अवस्थेमुळे जे अन्याय आणि अत्याचार करतात त्याबद्दल तर लिहावे तेवढे थोडे आहे ही व्यवस्था आपल्याला गुलामगिरी मध्ये लोटणारी आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

 

जातीच्या मानसिकतेचे आणखी काही दुष्परिणाम आहेत.प्रत्येक गोष्ट जातीच्या परीघातच पाहिली जाते आणि मानवी कर्तुत्वाला आपोआपच मर्यादा पडत जातात .जातीच्या अंतर्गत एक हुकूमशाही असते जातीचे ठेकेदार जातीतील लोकांना पुष्कळ वेठीस धरतात. वारणेचा वाघ, रानगंगा, पाझर, अलगुज, मास्तर ,कुरूप,तारा, मयूरा, अग्निदिव्य, मूर्ती या कादंबऱ्यातून त्यांनी मानवी जीवनाचे वास्तव्य साहित्यातून लेखन केले, त्यांच्या साहित्याने जगण्याला प्रेरणा दिली, दलित,शोषित, पीडित अशा सामान्य माणसालाच केंद्रस्थानी आणून त्यांनी सुख दुःख समजून घेऊन समाज दर्शन घडविले,
भारतीय वर्णव्यवस्थेच्या कुलूपबंद पेटीमध्ये जखडलेला असल्याने विषय वस्तू व नाटकत्व हे नेहमीच उच्चवर्णीच्या मूल्य व्यवस्थेला धरून असते या पार्श्वभूमीवर त्यांचे क्रांतिकारकत्व विचार लक्षात घेणे गरजेचे आहे ,आर्थिक कुचंबना, सामाजिक अप्रतिष्ठा, उच्चवर्णीया कडून होणारा अन्याय यातूनही माणूस पण जपणा-या अण्णाभाऊंनी रेखाटलेली पात्रे सामान्य माणसाच्या जगण्याला बळ देत राहतात. समाज परिवर्तनाचे उद्दिष्ट सदैव ते नजरेसमोर ठेवतात. विषमतेवर आधारलेली आणि माणसाला गुलाम बनून त्यांचा शोषण करणारी समाजव्यवस्था बदलने हा अण्णाभाऊचा ध्यास होता त्यामुळे त्यांनी आपल्या साहित्यात समाज परिवर्तन हा विषय वारंवार मांडला आहे. अण्णाभाऊ एके ठिकाणी म्हणतात झोपडीत दीन -दलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोट तिडकेची भाषा त्यांचे जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीतच बसून लिहू शकतो. मी बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. ‘माझा रशियाचा प्रवास’ करून त्या देशातील माहिती तेथील स्वच्छता, राहणीमान येथील लोकांना सांगितले.चित्रा ही कांदबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली स्टालिनग्राची लढाई पोवड्यातून अण्णांनी मांडली. ह अण्णाभाऊ 12 सप्टेंबर 1960 रोजी चितोडची राणी या विमानाने प्रवास करून ते माॅस्कोत पोहोचले अतिशय सुंदर वर्णन त्यांनी केले आहे .ज्याने आपल्या साहित्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये मोलाचे योगदान दिले *नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते,धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते अशी त्यांची विचारसरणी होती* लालबावटा हे कलापथक स्थापन करून त्यांनी आपली शाहिरी गाजवली ,1947 ला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस ते म्हणाले’ ये आजादी झुटी है। देश की जनता भुकी है।। असे ते शाहिरीतून परिवर्तन करत होते ,*माझी मैना गावाकडे राहिली। माझ्या जीवाची होतीया काहिली*
।।ही त्यांची लावणी अविस्मरणीय आहे,
अण्णाभाऊचे लेखन हे जीवनदृष्टी आणि वाड्मयीन दृष्टी व्यक्त करणारे आहे. *जग बदल घालूनी घाव। सांगून गेले मला भीमराव* हे गीत आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. युगायुगाचे समज नष्ट होण्यासाठी दलित समाज एकजीव होण्यासाठी त्यांनी दिलेला हा संदेश लाख मोलाचा आहे .मार्क्सवादी तत्त्वविचारांचा प्रभाव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आणि स्वतःची स्वतंत्र प्रतिभाशक्ती या अविष्कारामधून एक वेगळ्याच रसायनाचे साहित्य त्यांनी निर्माण केले. म्हणून फकीरा ही कादंबरी 22 भाषेत भाषांतरित झाली. 1961 मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार फकीरा कांदबरीस मिळाला .
1958 च्या साहित्य संमेलनात त्यांनी *पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती दलित व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे* असे स्पष्टपणे मांडले. फकीरा ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला त्यांनी अर्पण केली. अण्णाभाऊचे साहित्य जतन करून ते येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावे. मराठी भाषा समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले. म्हणूनच ते खरोखर समाज सुधारक लोक कवी आणि साहित्यिक होते .
केंद्र शासनाने त्यांच्या स्मरणार्थ 2021 मध्ये पोस्टाचे तिकीट काढून त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार केला. जागतिक कीर्तीचे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन

*शब्दांकन*
*प्रा बरसमवाड विठ्ठल गणपत* संस्थापक अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *