नांदेड दि. अधिक मास नेहमीच भक्तांनी भगवंताची आराधना करण्यासाठीचा असतो. यावर्षीचा अधिक मास हा श्रावण महिन्याला सलग्न आल्यामुळे त्याला मोठे महत्व आहे. याच काळात हा सत्संग सोहळा घडवून आणणारा मोरगे परिवार यांचे धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन काशी पिठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आज येथे केले.
येथील भक्ती लॉन्समध्ये अधिक मासाचे औचित्य साधून श्री काशी जगद्गुरू यांचे आशिर्वचन, सामुहिक पाद्यपुजा व दर्शन सोहळ्याचे आयोजन मोरगे परिवारानी केले होते. यावेळी भक्तांना आशिर्वचन करताना श्री काशी जगद्गुरू बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अधिक मासामध्ये लग्न, वास्तूशांती यासह काही पवित्र कार्य केल्या जात नाहीत. अशावेळी हा महिना ईश्वराच्या अधिक जवळ जाता यावा यासाठी ईश्वर नामस्मरण, सत्संग, अन्नदान आदी उपक्रम राबवून ईश्वराशी सलग्नतः करता येते. त्यामुळे या महिन्याला वेगळे महत्व आहे. त्या पार्श्वभूमीवर मोरगे परिवारानी हा सत्संग सोहळा आयोजित करून भक्तांना ईश्वराच्या जवळ नेण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्रीश्रीश्री 1008 डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी जगद्गुरू यांचे पाद्यपुजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी वसमतकर महाराज, बिचकुंदेकर महाराज, जिंतुरकर महाराज, मुखेडकर महाराज, सोनपठकर महाराज, अमृतेश्वर महाराज, आष्टीकर महाराज, बसवलिंग महाराज यांच्यासह अन्य शिवाचार्यांनी आपल्या आशिर्वचनातून भगवंत भक्तीचा मार्ग सांगितला.
यावेळी दक्षिणेतील रामेश्वर या ठिकाणच्या भाविकांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी बांधण्यात येणाऱ्या धर्मशाळेच्या प्रारूप आराखड्याचे प्रकाशन श्री काशी जगद्गुरू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावरील सर्व शिवाचार्यांसह स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, श्रीमती वंदनाताई मोरगे, उद्योजग सुमित मोरगे, सौ. एैश्वर्या सुमित मोरगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबन बारसे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, माधवराव एकलारे, जयदत्त तत्तापुरे, अजय सायाळकर, गोविंद गोदरे, मराठवाडानेताचे संपादक रामेश्वर बद्दर, सचिन गुणगुणे आदींची उपस्थिती होती. श्री काशी जगद्गुरू यांच्या आशिर्वनानंतर आयोजित केलेल्या महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला.