नांदेड – ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाचा प्रारंभ क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी जवळा देशमुख येथील प्राथमिक शाळेत करण्यात आला. देशाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे आणि या महोत्सवात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. यादिवशी सर्व कार्यालयांत ‘पंचप्राण शपथ’ कार्यक्रम सकाळी १० वाजता घ्यावी तसेच या कार्यक्रमात नागरिकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली या अंतर्गत ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाला सुरुवात झाली.
यामध्ये भारताला २०४७ पर्यंत विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान सदैव बाळगण्याची, एकता व एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष राहण्याची, नागरिकाचे कर्तव्य बजावण्याची व देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कायम आदर राखण्याची ‘पंचप्राण’ शपथ ९ आॅगस्ट रोजी सकाळी १० वा. एका हाताच्या ओंजळीत माती घेऊन जवळा देशमुख येथील चिमुकल्यांसह गावकऱ्यांनी घेतली. यावेळी सरपंच कमलताई शिखरे, साहेब शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, मनिषा गच्चे आदींची उपस्थिती होती.