एस.आर.रंगनाथन : भारतीय (Library Science) ग्रंथालयशास्त्राचे जनक

एस.आर.रंगनाथन : भारतीय (Library Science) ग्रंथालयशास्त्राचे जनक
“ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचं संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा आज स्मृतिदिन आहे.”
ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवणं, त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली. ज्याआधारावरच ग्रंथालयशास्त्राचा पाया रचला गेला आहे.
भारतातच नाही तर जगभरातल्या सर्वच ग्रंथपालांना रंगनाथन यांच्या तत्त्वांचा अभ्यास करावाच लागतो. ग्रंथालयशास्त्र म्हटलं की डुई डेसिमल वर्गीकरणाचे जनक मेलविल डुई आणि डॉ. एस. आर. रंगनाथन या दोघांचं नाव सर्वांत आधी घेतले जातं. आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये जी काही प्रगती झालेली दिसत आहे त्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान डॉ. एस. आर. रंगनाथन यांचं आहे. त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हटलं जातं. त्यांच्या कार्याचा परिचय आपण या लेखात करून घेणार आहोत.
शियाली रामामृत रंगनाथन यांचा जन्म तामिळनाडूतील शियाली या गावात 9 ऑगस्ट 1892 ला झाला. दहावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गणित या विषयात बीए आणि एमएचं शिक्षण पूर्ण केलं. 1917 ला ते मँगलोरमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. चार वर्षं मँगलोरमध्ये शिकवल्यानंतर ते 1921 ला चेन्नई ( तत्कालीन मद्रास) च्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. 1923 मध्ये मद्रास विद्यापीठाने ग्रंथपालाच्या नियुक्तीसाठी जाहिरात काढली. ग्रंथपाल म्हणून निवड झालेल्या व्यक्तीला लंडनला पाठवण्यात येईल असंही त्यात म्हटलं होतं. त्यावेळी भारतात ग्रंथालयशास्त्राची औपचारिक पदवी कुणाकडेच नव्हती. त्यामुळे अर्थातच केवळ या विषयाची जिज्ञासा असलेल्या उच्चशिक्षितांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार होतं. रंगनाथन यांच्या मित्रांनी आग्रह केला की रंगनाथन यांनी हा अर्ज भरावा. ते तयार देखील झाले. या जागेसाठी तब्बल 900 अर्ज आले. त्यापैकी योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आलं होतं आणि त्यामधून रंगनाथन यांची 1924 साली मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून निवड झाली. मुलाखतीला आलेल्या उमेदवारांपैकी रंगनाथन हे एकमेव उमेदवार होते ज्यांचे कोणत्याही विषयावर शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते.
लंडनमध्ये ग्रंथालयशास्त्राचं शिक्षण
1917 ते 1923 या काळात त्यांचे ‘गणिताचा इतिहास’ या विषयावर अनेक शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले होते. रंगनाथन यांची निवड तर झाली पण रोज विद्यार्थ्यांमध्ये रमणाऱ्या प्राध्यापक रंगनाथन यांना ग्रंथपालाची नोकरी ही कंटाळवाणी वाटू लागली. प्राध्यापक असताना अभ्यासासाठी जो वेळ मिळत होता तो ग्रंथालय सांभाळण्याच्या व्यवस्थापकीय कामात मिळत नसल्यामुळे त्यांची घालमेल होऊ लागली होती. त्यांनी आपल्या मनातली खदखद वरिष्ठांना सांगितली. त्यांनी त्यांची समजूत काढली आणि ते त्यांना म्हणाले. विद्यापीठ तुम्हाला ग्रंथालयशास्त्राच्या प्रशिक्षणासाठी लंडनला पाठवत आहे. जर तुम्ही ते प्रशिक्षण घेतले तर नक्कीच हा विषय तुम्हाला आवडू शकेल. तेव्हा राजीनाम्याचा विचार तुम्ही लंडनहून परत आल्यावरच का करत नाहीत? रंगनाथन यांना हा विचार पटला. ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे ग्रंथालयशास्त्राचं प्रशिक्षण घेण्यास पोहोचले. त्या ठिकाणी ते बर्विक सेयर्स या प्राध्यापकाच्या संपर्कात आले. बर्विक सेयर्स हे ग्रंथालयशास्त्रातील वर्गीकरण या विषयाचे तज्ज्ञ होते. त्यांनी रंगनाथन यांना सुरुवातीला लंडनमधील विविध ग्रंथालयांना भेट देण्यास सांगितलं. ज्यावेळी त्यांनी लंडनमधील ग्रंथालयं आणि त्यांचं कामकाज पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारतासारख्या देशात ग्रंथालयांची खूप गरज आहे. सर्वांसाठी ज्ञानाची दारं खुली करणारी संस्था म्हणून ते ग्रंथालयाकडे पाहू लागले.
लंडनममध्ये असलेल्या वास्तव्यात त्यांनी ग्रंथालयशास्त्राचा कसून अभ्यास केला. ‘स्कूल ऑफ लायब्ररियनशिप’ मधील आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. लंडनमधील क्रायडन सार्वजनिक ग्रंथालयात अल्प काळ कामदेखील केलं. तिथंच त्यांनी ग्रंथालयांच्या कामाची पद्धत अभ्यासली. आणि भारतात कोणत्या गोष्टी आपण लागू करू शकतो याचा देखील विचार केला. भारतात परत येण्यापूर्वीच त्यांच्या डोक्यात विचारांची चक्रं घुमू लागली होती. भारतीय पुस्तकांचं वर्गीकरण करण्यासाठी विशेष पद्धत असावी, असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यांच्याजवळ असलेल्या गणिताच्या विशेष ज्ञानाचा वापर ग्रंथालयांसाठी व्हावा असं त्यांना वाटू लागलं. त्यातूनच पुढे कोलन वर्गीकरण (द्विबिंदू वर्गीकरण पद्धत) पद्धतीचा जन्म झाला. पुस्तकांच्या वर्गीकरणाच्या एकूण आठ पद्धती आहेत त्यापैकी एक रंगनाथन यांनी तयार केलेली पद्धत आहे.
‘दोन रुपये चौदा आण्यांचा दंड भरला’
1925 मध्ये मद्रासमध्ये परत आल्यावर ते कामावर रूजू झाले. प्रशिक्षित ग्रंथपाल म्हणून कामास झाल्यावर त्यांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर ते म्हणजे त्यांच्यावर असलेला 2 रुपये 14 आण्यांचा दंड त्यांनी भरला. जेव्हा ते दंड भरण्यासाठी खिडकीजवळ आले तेव्हा आपले साहेबच आपल्यासमोर दंड भरण्यासाठी उभे आहेत हे पाहून तो कारकून वरमला. त्याने रंगनाथन यांना म्हटले की “सर, तुम्हाला स्वतः येण्याची काय गरज होती सहाय्यकाला पाठवता आलं असता ना.” त्यावर ते म्हणाले, “नको तुम्ही मला दंड लावला ही गोष्ट सहाय्यकाला कळू नये म्हणून तर मी स्वतः आलो.” त्यांची व्यवसायनिष्ठा दर्शवणारा हा किस्सा त्यांचं आत्मचरित्र ‘अ लायब्ररियन लुक्स बॅक’मध्ये देण्यात आला आहे.
ग्रंथालयशास्त्राची मूलभूत तत्त्वं
रंगनाथन यांनी 1928 मध्ये मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना करून भारतातल्या सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. 1931 मध्ये त्यांचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ ‘द फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स’ प्रसिद्ध झाला. भारतीय ग्रंथालयांची चौकट रंगनाथन यांनी दिलेल्या या पाच सिद्धांतावरच आहे. हे नियम वरवर पाहता अत्यंत साधे वाटू शकतात पण त्यामुळे भारतातल्या ग्रंथालयांना कलाटणीच मिळाली. कारण सामान्य वाचकाचा विचार करून त्यांनी ही तत्त्वं मांडली आहेत. हे नियम वाचकाला माहीत असतील तर त्याचंदेखील काम सुलभ होऊ शकतं हा विचार करूनच त्यांनी हे नियम मांडले. संशोधनाबद्दल असलेल्या त्यांच्या या दृष्टिकोनामुळेच त्यांना ‘प्रॅग्मॅटिक फिलॉसॉफर’ किंवा ‘व्यावहारिक तत्त्वज्ञ’ असं म्हटलं जातं. ते नियम असे आहेत,
1. ग्रंथ हे वाचण्यासाठीच असतात.
2. प्रत्येक वाचकासाठी पुस्तक असतं.
3. प्रत्येक पुस्तकासाठी वाचक असतो.
4. ग्रंथपालाचा आणि वाचकाचा वेळ वाचला पाहिजे.
5. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. (सातत्याने वाढ होत जाणारी)
1931 ते 1967 या काळात त्यांनी विपुल ग्रंथलेखन केलं. ग्रंथालय आणि माहितीशास्त्रावरील त्यांची 65 पुस्तकं आणि 2500 हून अधिक लेख प्रकाशित आहेत. या विषयावर इतकं विपुल लिखाण केलेले ते जगातील एकमेव अभ्यासक होते. भारतात जर ग्रंथालय वाढवायची असतील तर ग्रंथपाल देखील लागतील त्यासाठी भारतातच यावर पदवीचं प्रशिक्षण मिळावं असं त्यांना वाटू लागलं. मद्रास विद्यापीठात त्यांच्या पुढाकाराने ग्रंथालयाशास्त्राचा शिक्षणक्रम सुरू झाला. पुढे बनारस हिंदू विद्यापीठातही त्यांनी हा अभ्यासक्रम सुरू केला. 1945 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी रंगनाथन यांची नियुक्ती बनारस विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून केली. पुढील दोन वर्षं ते या ठिकाणीच राहिले.
ग्रंथालय विधेयक
भारतात ग्रंथालयाची चळवळ ही सरकारी अनुदानाशिवाय उभी राहू शकत नाही ही गोष्ट त्यांनी सुरुवातीलाच हेरली. त्यामुळेच पूर्ण देशभरातच असा कायदा असावा ज्यामुळे ग्रंथालयांचे नियमन आणि व्यवस्थापन सुलभ होऊन ग्रंथालयं सर्वांसाठी खुले होतील, असा विचार त्यांनी केला. 1930 साली बनारसमध्ये अखिल भारतीय शिक्षण परिषद झाली होती. त्यावेळी त्यांनी असा कायदा असावा हा विचार मांडला. 1850 मध्ये इंग्लंडमध्ये हा कायदा मंजूर झाल्यानंतर तिथल्या ग्रंथालयांची प्रगती त्यांनी स्वतः पाहिली होती. त्यातूनच या विधेयकासाठी त्यांनी सर्व स्तरातून जोर लावला. विविध ग्रंथालय सोसायटींच्या माध्यमातून ते आपले विचार मांडत राहिले. इंग्रजांचं सरकार असताना हा कायदा कोणत्याही राज्याने लागू केला नाही. पूर्ण भारतात त्याला एकच अपवाद होता. तो म्हणजे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर संस्थानाचा. 1945 साली करवीर संस्थानने ग्रंथालयाचा कायदा मंजूर केला होता. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर तामिळनाडूने 1948 साली हा कायदा मंजूर केला. त्यानंतर अनेक राज्यांनी सार्वजनिक ग्रंथालयांचा कायदा मंजूर करून आपापल्या राज्यातली ग्रंथालय चळवळ पुढे नेली. महाराष्ट्रात हा कायदा 1967 मध्ये मंजूर झाला.
जगभरात व्याख्याने आणि पद्मश्रीने गौरव
ग्रंथालयशास्त्रावर आशिया, यूरोप, अमेरिका या खंडांतील अनेक देशांमधून त्यांनी व्याख्यानं दिली. यूनो, यूनेस्को, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय समित्यांवरही त्यांनी गौरवास्पद कामगिरी केली. 1957 मध्ये त्यांचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
27 सप्टेंबर 1972 रोजी वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं बेंगलुरूमध्ये निधन झाले.

 

श्री. अर्जुन बं. गजमल.
ग्रंथपाल
महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय मुखेड, नांदेड.
मोबा. ९४२१४०२१८०
ई मेल : [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *