श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी एक हजार  ग्रंथाचे दान 

 
नांदेड – श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस बौद्ध जीवनात फार महत्त्व आहे. या निमित्ताने तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रम संपन्न होणार असून शनिवारी १९ आॅगस्ट २०२३ रोजी  ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे ग्रंथदान स्वरूपात वाटप होणार आहे. सकाळपासूनच विविध कार्यक्रम होणार आहेत. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
            श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अंगुलीमाल बुद्धास शरण आल्यावर महान भिक्खू झाला आणि त्याने निर्वाण प्राप्ती करून घेतली व अर्हंत पदास गेला. पहिल्या धम्म  संगीतीत वरील कोणताही ग्रंथ लिपीबद्ध नव्हता. केवळ मौखिक संपादन कार्यालाच संगीती असे म्हणतात. ही प्रथम धम्म संगीती ९ महिने चालली होती. या धम्म संगीतीचा आरंभ श्रावण पौर्णिमेला झाला होता म्हणून या श्रावण पौर्णिमेला महत्व आहे. तसेच ही पौर्णिमा वर्षावास काळात येते, त्यामुळे या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या पौर्णिमेला उपासक, उपासिका उपोसथ व्रत धारण करून अष्टशीलाचे पालन करतात. धार्मिक स्थळांना भेटी देणे, धम्म प्रवचन, चिंतन, मनन करणे अशा तऱ्हेने ही पौर्णिमा साजरी करावी, असे भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सांगितले.
           येत्या १९ आॅगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेनिमित्त खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात श्रामणेर दीक्षाभूमीच्या भव्य बांधकामास प्रारंभ होणार आहे. त्यासाठी बांधकाम साहित्याचे दान श्रद्धावान उपासकांकडून होत आहे. याच दिवशी पौर्णिमोत्सव कार्यक्रम होणार असून त्यात थायलंड या बौद्ध राष्ट्राचा अभ्यास करून परतलेल्या उपासक उपासिका यांचा सत्कार होणार आहे. स्वागत नगरच्या महिला उपासकांच्या वतीने भव्य भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तैवान देशातून प्राप्त झालेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाटप होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *