फेसबुकच्या माध्यमातून ज्यांच्या जीवनशैली विषयी मी भारावलो असे लेखक, पत्रकार महारुद्र मंगनाळे सरांच्या रुद्रा हटला भेट देण्याचा काल योग आला, रुद्रा हट प्रेमी स्नेह मेळ्याच्या निमित्ताने.
सकाळी लवकर कंधारहून निघालो, कुलदैवत माळेगाव च्या खंडेरायाचे दर्शन घेऊन 9 वाजता हटला पोहचलो. गेटमधून आत शिरताच बगिराने गुरगुरुन स्वागत केले. सर,रवी बापटले,डॉ.गोरे,गणेश सुवर्णा तुकाराम सह ओट्यावर बसले होते. त्यांना माझा परिचय दिला. यापुर्वी आमची ओळख नव्हती.सरांनी गप्पा व संवाद करत करत त्यांची शेती, शेततळे, विहीर,पोहण्याचे तळे व इतर खूप गोष्टी दाखवल्या. रुद्रा हट हा माझा एक देश आहे असेही ते म्हणाले.तोपर्यंत भरपूर मंडळी आली होती.पिंपळाच्या झाडाखाली आसनव्यवस्थेसह चहापाण्याची सोय केली होती. तेथेच सर्वांनी परिचय करुन दिला. हटचा परिसर पाहून सर्वजण आनंदून गेले.दीड दोन एकरचा परिसर विविध फळाफुलांनी नटला आहे. लगेच हटचे सोबती महारुद्र सरांसह रवी सर,सविता ताई,नरेश भाऊ, हर्ष,गबरु,अन्वी व इतर सर्वांनी मित्रमंडळींना आपुलकीने जेऊ घातले. जेवणात खीर,भज्जी,ज्वारी बाजरीची भाकरी,चपाती,वरणभात,ठेचा,तूप हे स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थ होते.
जेवणानंतर पिंपळाच्या झाडाखाली गाणी,कविता, गझलची मैफिल रंगली.अमर हबीब,रवी बापटले,रामेश्वर बद्दर,डॉ.गोरे सह जवळपास दोनशेच्या वर विविध क्षेत्रातील ध्येयवेडी मंडळी मेळ्याला उपस्थित होती. महारुद्र सरांच्या मनोगताने सांगता झाली.सायंकाळी मी कंधारकडे निघालो,रुद्रा हटला वचन देऊन पुढील वर्षी पुन्हा येण्याचे.
रुद्रा हटला बघण्याबरोबरच जगण्यासारखे भरपूर आहे.
रुद्राहट एक आनंददायी जीवनशैली आहे.माधव मुसळे ,कंधार.

