“आपल्या देशाचा तिरंगा हा वारयामुळे नव्हे तर ह्या देशातील शूर जवानांच्या धाडसामुळे शौर्यामुळे आज फडकतो आहे.
एकवेळ श्वास थांबेल पण देशप्रेमाचा मनातील भाव थांबणार नाही”
आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 76 वर्षे होत आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून, हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा असे आगळे वेगळे उपक्रम साजरे करताना ही दिसत आहे. हे सर्व स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळेच मिळाले. त्यांचे बलिदान विसरून आपल्याला चालणार नाही. जरा आठवून बघा. आपण ज्यावेळी गुलामगिरीमध्ये होतो त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. इंग्रज त्यांना वाटेल तसा मनमानी कारभार करत होते.
भारतीय लोकांमध्ये जाती-धर्माच्या नावाखाली भेदाभेद निर्माण करून त्याचा फायदा करून घेत होते. आपला देश कसा चालावा? यासाठी कुठलेही नियम आणि कायदे त्यावेळी नव्हते. केवळ अनागोंदीचे सर्वत्र परिस्थिती होती. इंग्रज आपल्या देशातून केवळ संपत्तीची लूट करत होते असे नाही तर पिळवणूक देखील करत होते. असे चित्र असताना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,सुभाष चंद्र बोस, सावरकर यासारखी अनेक मंडळी परदेशी शिक्षण घेऊ लागली होती.त्यांना सध्या आपण पारतंत्र्यामध्ये आहोत याची जाणीव होऊ लागली. आणि मग सर्वांनी जो संघर्ष केला ,उठाव केला तो म्हणजे आपला स्वातंत्र्यलढा होय.
आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही लोक शांततेच्या मार्गाने लढा देत होते, तर काही विद्रोहाच्या मार्गाने लढा देत होते. आज आकाशामध्ये तिरंगा फडकताना दिसत आहे, परंतु तिरंगा हा जरी फडकत असला तरी तो फडकवण्यासाठी किंवा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिलेल्या आहेत. तर दुसरीकडे जवान सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे.
शाळा,महाविद्यालय, कार्यालये अश्या विविध ठिकाणांहून ,भाषणांमधून आपण त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला पाहिजे, हा असा दिवस साजरा करणे म्हणजेच स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्यांना दिनाच्या दिवशी संपूर्ण भारतातील वातावरण हे देशभक्तीमय झालेले असते आज आपण पारतंत्र्यात नसलो तरी आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जे जवान डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहेत,म्हणूनच आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत यांचा विसर पडून आपल्याला चालणार नाही तर या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांच्या देखील कार्याला आपण सलाम केला पाहिजे.
आपला देश मोठा झाला पाहिजे. आपला देश आर्थिक महासत्ता झाला पाहिजे .नुसती स्वप्न पाहून चालणार नाही तर आजच्या तरुणाईने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मोबाईल, टीव्ही – इंटरनेट यांचा उपयोग आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी केला पाहिजे.आज बरेचसे विद्यार्थी या सोशल मीडियाचा उपयोग नको त्या कामासाठी करत आहेत. जर आपण असे करत राहिलो तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्या राष्ट्राने प्रगती किती केली? याविषयी आपण स्वाभिमानाने काही बोलू शकणार नाही.
आपली तरुण पिढी आज नको इतका वेळ मोबाईल, इंटरनेट,व्हाट्सअप ,फेसबुक यांच्यावरती घालवत आहे. खरोखरच ही एक चिंतेची बाब आहे. यांच्या वापरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. एकदा का आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली ,की आपल्या देशाचे रक्षण कोण करणार? सीमांचे रक्षण कोण करणार हे बळकट भाव कोठून येणार.या सर्वांचा विचार व्हायला हवा. आपण बौद्धिक आरोग्य इतके शारीरिक आरोग्याला देखील महत्व दिले पाहिजे .असा या स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया. आणि आपल्या महान व्यक्तींनी जे स्वप्न पाहिलेला आहे की भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचे ते स्वप्न पूर्ण करूया.
अंधश्रद्धा ,बेरोजगारी, दहशतवाद व वाढती लोकसंख्या सायबर क्राइम यासारख्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? यासाठी तरुण पिढीने योगदान दिले. तरच स्वातंत्र्य दिनाचा उत्सव यशस्वी झाला असे सर्व चित्र असेल.
देशप्रेम, देशभक्ती रक्तात असली पाहिले
रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनली पाहिजे…
देशभक्ती या शब्दातच भक्ती आहे…आणि ही भक्ती निर्विकार,निसंकोच,अखंड,निरामय अशी केली पाहिजे...याचबरोबर या तिरंग्याचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
जय हिंद, जय भारत
सौ.रूचिरा बेटकर,नांदेड
9970774211