श्रेणी-१ दवाखाना असूनही प्रमुखाची खुर्ची रिकामीच
कुरुळा:विठ्ठल चिवडे
एकीकडे कोरोनाचे थैमान चालू असतानाच पशुधनावर संसर्गजन्य लम्पि या त्वचारोगाने डोके वर काढले असून पशुपालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.त्यातच दवाखान्यात मागील काही दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची खुर्ची रिकामीच असून पशुवैद्यकीय दवाखान्याचा डोलारा आता सेवकांच्या हाती असल्याचे पहावयास मिळते.
कुरुळा येथे श्रेणी -१ चा पशुवैद्यकीय दवाखाना असून या दवाखान्याअंतर्गत कुरुळा परिसरातील वाडी तांड्यासह एकूण २२ गावांचा समावेश होतो.डोंगराळ भाग आणि शेतीतील जेमतेम उत्पन्न यामुळे शेतकरी शेतीपूरक दुभती व इतर पाळीव पशूंची जोपासना करतो.परिसरात सुमारे बारा हजारांच्या वर प्राणीसंख्या असून पशूरोगनिदान व उपचारासाठी पशुपालकांना कुरुळा येथे धाव घ्यावी लागते.परंतु येथे आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत दवाखान्यातील उपलब्ध सेवकांकडूनच उपचार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.सद्यस्थितीत जनावरे संसर्गजन्य लम्पि या त्वचारोगाने ग्रासले असून पशुधनाला वाचवण्यासाठी पशुपालकांना दवाखान्याकडे पायपीट करावी लागते.मोठ्या प्रमाणात येत असलेल्या पशूंच्या रोगनिदान व उपचाराची जबाबदारी ही दोन सेवकांवरच अवलंबून असल्याचे पहावयास मिळते.१८ ऑगस्ट पासून येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्याने दोन सेवकासह एक ड्रेसर दवाखाण्यात उपस्थित असून कर्तव्यावरच ड्रेसर हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पाहायला मिळाले.मागील पाच वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या महागड्या पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून त्यातच लम्पि रोगाच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गाय, बैल,कालवड व तत्सम प्राण्याची गर्दी दवाखाण्यासमोर होत आहे.वरिष्ठांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा पशुपालकांनी केली आहे.