कविता
तू काम करत असलेल्या फर्लांगातून
प्रवास करणा-या मनाची वाहनं समाधानाने दौडत
पावसाच्या पुरात
पुलाच्या तोंडी अडकलेल्या फेसाट्या
अलगद येत तुझ्या हातात
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
रेस्ट हाऊसमधली हरेक वस्तू अनं रंगीबेरंगी फुलं ओळखायची तुला
तुझ्याकडं पाहून करायचीत मंद मंद स्मित
तहसील आणि पंचायत समिती
15 ऑगस्ट/26 जानेवारीला
स्वछ परिसरात करायची राष्ट्रीय ध्वजाला वंदन…
साहेब तुझ्या कामावर व्हायचा खुश
इतरांना म्हणायचा-
“महादेवकडून शिका काहीतरी..!”
तू नेहमीच कामात असलेला पाहून माणसं म्हणायचीत
“तुले जास्त पैसे भेटतत का गा…?”
तू न्यायचा हसण्यावर
एखादं काम कुणाला नाही जमलं तेव्हा मात्र
तुच यायचा कामी
अनं मग महादेवचा व्हायचा-‘मास्टर महादेव..!’
जिल्हा परिषदेच्या शाळेचं छप्पर शिवतांना
आरोग्य केंद्राच्या बांधकामावर चौकिदारी करतांना
बोल्डर,गिट्टी,मुरुमाचे बीट बांधतांना
पंचायत समितीच्या क्वार्टरला सफेदी मारतांना
तू छावलस आमचही जगणं…
तुझे सतत चालणारे पाय
मलाही कधीच बसू देत नाहीत स्वस्थ
मीही विद्यार्थ्यांसोबत दिवसभर असतो कामात
फिरत असतो गावोगांव
जागृतीचा अग्नी हाती धरुन…
आमच्या गळक्या आयुष्यावर तुच पांघरलास स्वाभिमान
तुझ्या कामाची अभियांत्रिकी पाहून
इंजीनियरही व्ह्ययचा थक्क…
तुझ्या तुटपुंज्या पगाराच्या दिवशी
मी जगातल्या सर्वात श्रीमंत बापाचा असायचो मुलगा…
तुला ओळखणारे म्हणतात
मी तुझ्यासारखा दिसतो
इंजीनियर झालेले माझे विद्यार्थी आता
मला संबोधतात मास्टर…
—- संजय ओरके, वर्धा