=======कृपया पूर्ण वाचावे.=========
नांदेड ■
शिक्षक दिनाच्या औचित्याने नांदेड तालूक्यातील केंद्र तरोडा (बु.) येथे – मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत – केंद्रस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन तरोडा (बु.) केंद्राचे केंद्रप्रमुख विजयकुमार धोंडगे यांनी स्वखर्चाने केले होते.त्यांच्या या नियोजनामुळे एक आगळावेगळा पुरस्कार वितरण कार्यक्रम होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरोडा (बु.) येथील जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक नारायण देशमुख गुरूजी तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड तालूक्याचे गटशिक्षणाधिकारी रूस्तूम आडे , ‘आस ‘ शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष युवराज पोवाडे,शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे आणि शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कल्याणकर हे होते. प्रथमतः डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी व श्री.शि.भ.प.डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली . तद्नंतर सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक विजयकुमार धोंडगे यांनी सविस्तर मांडत म्हटले की, केंद्रातील सर्वच शिक्षक होतकरू व उपक्रमशील आहेत .पुरस्कारासाठी प्रातिनिधीक स्वरूपात दोन तंत्रस्नेही शिक्षिकांची निवड झालेली आहे.
प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांचा सत्कार झाला. तसेच उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. त्यानंतर तरोडा केंद्रांतर्गत कासारखेडा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ.सारिका आचमे आणि वानेगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती सुनिता गुड्डा यांना स्मतीचिन्ह,शाॅल व पुष्पहार देवून उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त तरोडा बु. केंद्राचे केंद्रप्रमुख विजयकुमार धोंडगे यांनी स्वखर्चाने नाविण्यपूर्ण प्रेरणादायी उपक्रम राबविल्यामुळे त्यांचा ; ‘आस ‘ शिक्षक संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष युवराज पोवाडे यांनी शाॅल व पुष्पहार देवून सत्कार केला. त्यांबरोबरच कोरोनाशी लढा देवून कोरोनामुक्त होवून आलेले मुख्याध्यापक गंगाधर तोडे यांचाही सत्कार करण्यात आला.
नांदेडचे गटशिक्षणाधिकारी रूस्तूम आडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, कोरोना लाॅकडाऊनच्या काळात – लाॅकडाऊनचे नियम पाळून ; सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे. नारायण देशमुख गुरूजींनी मनोगत व्यक्त करून तरोडा बु. शाळेसाठी मोठी सतरंजी भेट देण्याचे घोषित करून अध्यक्षीय समारोप केला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मु. अ. गंगाधर तोडे यांनी केले तर तरोडा खु. चे मु .अ.तेललवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.