शॉट असावा तर असा..

 

कधी कधी सचिन ला आणि मला काहीतरी वेगळं करायची हुक्की येते.. नवरा बायको असलो म्हणुन काय झालं , थोडा रोमान्स टिकवायचा असेल तर बदल हवा काहीतरी हटके हवं मग माझ्या लेखिकेच्या डोक्यात काहीतरी भन्नाट आयडीयाज येतात ..

 

कधीतरी त्या बहरतात कधीतरी फेल जातात..
मुळात रसिकता ठासुन भरलेली असल्याने शब्दावर विनोद सुचतात आणि घरात हास्याचे फवारे उडतात.. इतर नवरा बायको सारखं रटाळवाणं लाइफ नक्कीच नाही.. पण कधीतरी करायला जातो गणपती आणि होतं माकड असही होतं..

 

काल संध्याकाळी असच काहीसं गमतीशीर घडलं.. सचिन मला म्हणाला , आज शॉट मारायचा का ??.. २५ वर्षानंतरही इश्य असा सहज शब्द तोंडुन आला.. सोनल तु आणि लाजतेस ??.. असा खडुस प्रश्न सचिनकडुन आला आणि मग मात्र मी जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं.. आमच्यात साधी धुसफुसही नसते त्यामुळे भांडण व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही.. लटक्या रागात बेडरुममधे गेले आणि कपाटातुन नाईटी काढली.. गुलाबी नाईटी , परफ्युम , गुलाबी रंगाच्या गोल रिंग्ज असं सगळं बेडवर काढलं..

 

अगं तसं नाही सोनल ,वन पीस घाल .. मला काहीच कळेना.. शॉट मारायला बाहेर जायचय म्हणजे ???…
तु आवर गं.. जास्त प्रश्न विचारु नकोस असं तो म्हणाला आणि त्याने स्वतः आवरायला घेतलं.. तितक्यात माझ्या मित्राचा फोन आला.. काय करतेस सोनल , कॉफीला भेटायचं का ??.. मी म्हटलं , अरे सचिन म्हणतोय ,शॉर्ट मारायला जाऊ.. त्याने फोनवरच मोठा पॉज घेतला आणि म्हणाला ,आता मीही घरी जाऊन बायकोला हेच म्हणतो.. उद्या बोलु गं असं म्हणुन त्याने फोन ठेउन दिला.. आता याला काय झालं ?? आणि तुम्ही पण इतकं मन लावुन काय वाचताय..??.. मलाच अजुन काहीही झेपलेलं नाही तुम्हाला काय सांगु.. आम्ही दोघे तर ड्रींक पण करत नाही आणि तो माझ्यासारखा वात्रट पण नाही.. तरीही मी विचार केला कधी नव्हे तो नवरा लाडात आलाय जरा बघुच शॉट मारुन.. काहीतरी नवीन नक्कीच गवसेल आणि फॅंटसीज ॲंड ब्युटीज इन सेक्स कादंबरीत लिहायला नवीन फॅंटसी सापडेल असा विचार करुन बाहेर पडले.. बाहेर पडलो ते डायरेक्ट कोथरूडमधील फलाहार मधे.. तिथे गेल्यावर सचिनने २ जामुनशॉट ऑर्डर केले आणि त्याचक्षणी माझे गुलाबी गाल जांभळे झाले..

 

 

कपाळावर हात मारला आणि वेटरकडे पहात मनातच म्हटलं, थोडा वेळ इथे फिरकु नकोस नाहीतर रामायण , महाभारत नवीन रुपात दिसेल.. ग्लास उचलला तितक्यात सचिनने माझे फोटो काढायला सुरुवात केली.शॉट ओठाला लावताच ओठाचा रंग जांभळा झाला आणि चेहऱ्यावर हास्य आलं जे त्याने फोटोत कॅप्चर केलं..
असा कुठं असतय व्हय शॉट.. मी आपली उगाचच..
जाऊ देत ना..

 

 

तुम्ही पण काय काय विचार केला राव.. २५ वर्षे लग्नाला झाल्यावर दुसऱ्या कुठल्या शॉट ची आपण अपेक्षा करणार..आता तुमच्या डोक्याला जास्त शॉट देत नाही.. फक्त हसा .. मनसोक्त हसा ..
यालाच म्हणत असावेत शब्दांचा कीस पाडणे..

 


सोनल गोडबोले..
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *